अमरावती शहरात ३५ लाखाच्या वीज चोऱ्या उघड…
अमरावती – विदर्भातील ११ जिल्ह्यातील महावितरणच्या १२ भरारी पथकाच्या माध्यमातून शहरात वीज चोरी विरोधात एकाच वेळी धाडसत्र राबविण्यात आले. तीन दिवस चाललेल्या या धाडसत्रात अमरावती शहरातील ८२ ग्राहकांकडून ३५ लाख २३ हजार रूपयाच्या वीज चोऱ्या होत असल्याचे उघड करण्यात आले आहे. तडजोडीच्या रकमेसह वीज चोरीची रक्कम न भरणाऱ्या वीज चोरांवर फौजदारी दाखल करण्याची प्रक्रीया सुरू करण्यात आली आहे.
शहरातील काही भागात अनाधिकृत वीज वापराच्या सुळसुळाटामुळे यंत्रणा भारीत होऊन शॉर्ट सर्कीटचे ,वारंवार विज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे महावितरणलाही विनाकारण ग्राहकांच्या मनस्तापाला सामोरे जावे लागले. याशिवाय महावितरणला लाखो रूपयाचे नुकसान होत असल्याने महावितरणकडून वीज चोरी विरोधात नियोजनबध्द मोहीम आखण्यात आली.
यासाठी अधिक्षक अभियंता दिलीप खानंदे यांच्या पुढाकारने विदर्भातील ११ जिल्ह्यातील १२ भरारी पथकाला पाचारण करून एकाच वेळी धाडसत्र राबविण्यात आले. आगामी काळातही वारंवार विजचोरी विरोधात मोहीम अधिक तिव्र करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहीती कार्यकारी अभियंता आनंद काटकर यांनी दिली आहे.
वीज मीटर मध्ये फेरफार तसेच छेडछाड केल्यास महावितरणकडून वीज ग्राहकांवर कलम १३५ अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येतो. दिनांक १४ ते १६ जुन दरम्यान अमरावती शहरात वीज चोरीविरोध्दात केलेल्या कारवाईत भाजी बाजारात ३१ ,कडबी बाजार ५० आणि जवाहर गेट परिसरात ०१ अश्या एकून ८२ ठिकाणी १ लाख ९५ हजार ६७२ युनिट आणि ३५ लाख २३ हजार ४७० रूपयाची वीज चोरी झाल्याचे उघड झाल्याने त्यांना ४ लाख ७८ हजार रूपयाचा वीज चोरीच्या रकमेव्यतिरिक्त तडजोडीचा दंड ठोठावण्यात आला आहे.

वीज मीटर मध्ये फेरफार करून किंवा छेडखानी करून ग्राहक वीज बिल कमी करण्याचा प्रयत्न करतात.त्यासाठी मॅग्नेट किंवा चिप लावून मीटरची गती कमी करण्याचा प्रयत्न करतात. रिमोटच्या माध्यमातूनही असे प्रकार करण्यात आल्याचे या पूर्वी उघड झाले आहे.वीज मीटर मध्ये फेरफार अथवा छेडखानी करणे हा विद्युत विद्युत कायद्यानुसार गुन्हा असून या अंतर्गत संबंधित वीज ग्राहकावर कलम १३५ अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येतो.
तसेच अशा ग्राहकांवर वीज चोरी करण्यात आलेल्या युनिटच्या दुप्पट रक्कम आकारण्यात येते.प्रति केडब्ल्यूएचपी नुसार औद्योगिक ग्राहकावर १० हजार रुपये,वाणिज्यिक ग्राहकावर ५ हजार रुपये तर इतर वर्गवारीतील ग्राहकावर २ हजार रुपये दंडात्मक कारवाई म्हणून तडजोडीचे शुल्क आकारण्यात येतो. गुन्हा सिद्ध झाल्यास ३ वर्षापर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे.वीज मीटर मध्ये फेरफार करण्यासाठी प्रवृत्त व सहकार्य करणाऱ्या विरुद्ध विद्युत कायद्यातील कलम १५० नुसार गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे.