Homeगुन्हेगारीAkola | आजोबा आणि नातवाचा पुराने घेतला बळी...तंबाखूची डबी ठरली कारणीभूत...तांदूळवाडी येथील...

Akola | आजोबा आणि नातवाचा पुराने घेतला बळी…तंबाखूची डबी ठरली कारणीभूत…तांदूळवाडी येथील दुर्दैवी घटना.

संजय आठवले आकोट

Akola – आकोट शहरापासून पाच किलोमीटर अंतरावरील ग्राम तांदूळवाडी येथील नदीचे पुरात आजोबा आणि नातू वाहून गेल्याने दोघेही मृत्युमुखी पडले आहेत. आजोबांचे प्रेत हाती लागले मात्र नातू अद्यापही बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे. तंबाखूच्या एका डबीमुळे ही दुर्दैवी घटना घडली आहे.

ह्या दुर्दैवी घटनेची हकीकत अशी की, ग्राम तांदूळवाडी येथील ६० वर्षीय शेतकरी प्रभाकर प्रल्हाद लावणे हे शेजारील ग्राम सोनबर्डी येथील पशुवैद्यकीय केंद्रात आपली म्हैस घेऊन गेले. त्यांचा अकरा वर्षीय चिमुरडा नातू आदित्य विनोद लावणे हा त्यांच्यासोबत होता. सोनबर्डी येथे जाताना नदी ओलांडून जावे लागते. जातेवेळी नदीचे पुलावरून कमी प्रमाणात पाणी वाहत होते. आपले म्हशीवर उपचार करून हे आजोबा आणि नातू घराकडे परतले. यावेळी मात्र पुलावरून वाहणाऱ्या पाण्यात बरीच वाढ झालेली होती.

आजोबा आणि नातू दोघेही पूल पार करण्यासाठी जल्दी ने जात होते. चालताना आजोबांच्या खिशातील तंबाखूची डबी पाण्यात पडली. ती उचलण्याकरिता लहानगा आदित्य माघारी आला. आणि तो डबी उचलीत असतानाच पाण्याच्या प्रवाहात अचानक वाढ झाली. त्याने आदित्य पुरा सोबत वाहून जाऊ लागला. हे काळजाचा ठोका वाढविणारे दृश्य दिसतात आजोबा प्रभाकर लावणे यांनी आदित्यला वाचविण्याकरिता पाण्यात उडी घेतली. परंतु पाण्याचा प्रवाह जबर असल्याने तेही पुरात वाहून जाऊ लागले. नदीकाठच्या शेतात असणाऱ्या युवकांनी हे दृश्य बघितले. त्यांनी त्वरेने पुरात उड्या घेऊन प्रभाकर लावणे यांना बाहेर काढले. परंतु उशीर झाला होता. काळाने डाव साधलेला होता. प्रभाकर लावणे यांचे केवळ प्रेतच हाती आले. इकडे त्याच युवकांनी आदित्यला शोधण्याचा आटोकाप प्रयत्न केला. परंतु त्याचा पत्ता लागलेला नाही.

सदर घटनेचे वृत्त कळताच आकोट तहसीलदार निलेश मडके, आकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन देशमुख, गटविकास अधिकारी किशोर शिंदे, मंडळ अधिकारी प्रशांत सहारे, तलाठी घुगे, ग्रामसेवक खारोडे यांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील प्रशासकीय कार्यवाही सुरू आहे. ह्या करूण घटनेने तांदूळवाडी परिसरात शोक पसरला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments