HomeMarathi News Todayआकोट | अपूर्ण रस्ता बांधकामाने बालकास इजा…नंदीपेठ वासी संतापले…पालिकेवर केला हल्लाबोल…उपविभागीय अधिकाऱ्यांनी...

आकोट | अपूर्ण रस्ता बांधकामाने बालकास इजा…नंदीपेठ वासी संतापले…पालिकेवर केला हल्लाबोल…उपविभागीय अधिकाऱ्यांनी बोलाविली बैठक.

संजय आठवले आकोट

आकोट शहरातील सोनू चौकातून थेट नंदीपेठ ते दर्यापूर मार्गाला जोडणाऱ्या रस्त्याचे बांधकाम अर्धवट स्थितीत असून त्याद्वारे निर्माण झालेल्या डबक्यात पडलेल्या आठ वर्षीय बालकाचे पायास दुखापत झाल्याने नंदीपेठवासियांमध्ये संताप उफाळून आला. संतापलेल्या शेकडो युवकांनी पालिकेवर हल्लाबोल करून पीडित बालकास चक्क मुख्याधिकाऱ्यांचे मेजावर ठेवून कामाबाबत त्यांना जाब विचारला. नागरिकांचे होणारे हाल आणि परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता आकोट उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी या कामासंबंधीत विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक सोमवार दिनांक ५ सप्टेंबर रोजी आयोजित केली आहे.

नगरोत्थान निधी अंतर्गत आकोट शहरातील अनेक रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यात सोनू चौक ते थेट नंदीपेठ येथून दर्यापूर मार्गाला जोडणारा शहरातील अति महत्त्वाचा रस्ता सुरू आहे. परंतु अतिशय दाट लोकवस्तीतून जात असलेल्या ह्या रस्त्याचे निर्माणात अनेक बाधा निर्माण होत आहेत. त्यात प्रामुख्याने लोकांनी केलेले अतिक्रमण, विद्युत पथदिवे यांचा समावेश आहे.

वास्तविक हे काम पालिकेकडेच द्यायला हवे होते. मात्र काही कारणास्तव राजकीय इच्छाशक्तीने हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपविण्यात आले. तरीही नियमानुसार बांधकामासाठी हा रस्ता मोकळा करणे, हा पालिकेचा जिम्मा आहे. त्या अनुषंगाने पालिकेने भूमी अभिलेख विभागाकडे शासकीय भरणा भरून या रस्त्याची मोजणी केली आहे. मात्र त्या विभागाकडून योग्य त्या खुणा करून देण्यात न आल्याने रस्ता बांधकामात अडचणी निर्माण होत आहेत. परिणामी रस्त्याचे खोदकाम झाल्याने नागरिकांना अतिशय अडचणीचा सामना करावा लागत आहे.

नंदी पेठ परिसरातील हजारो महिला, पुरुष, वृद्ध, शालेय विद्यार्थी, शेतकरी या साऱ्यांना अवागमना करिता हाच एकमेव रस्ता आहे. तोच अतिशय खडतर झाल्याने नागरिक अतिशय हैराण परेशान झाले आहेत. रोज होणारे किरकोळ अपघात, नागरिकांना चालताना करावी लागणारी कसरत याने नागरिक अतिशय त्रस्त झाले आहेत.

अशातच दिनांक २ सप्टेंबर रोजी स्वराज राजू उपासे हा आठ वर्षीय बालक शाळेत जाताना या रस्त्याच्या खोदकामामुळे झालेल्या डबक्यात पडला. नूकताच पाऊस झाल्याने या डबक्यात पाणी साचले होते. अचानक तोल जाऊन पडल्याने या बालकाच्या पायाला फ्रॅक्चर झाले. त्याचे पायात रॉड टाकावा लागला. ह्या घटनेने नंदीपेठ वासियांचा राग अनावर झाला. या स्थितीत तेथील युवकांनी पुढाकार घेऊन दुखापत झालेल्या बालकाला रुग्णवाहिकेतून पालिकेत आणले. आणि या बालकाला स्ट्रेचर सहित पालिका मुख्याधिकाऱ्यांच्या मेजावर ठेवले. त्यानंतर बराच वेळ या संतप्त युवकांनी मुख्याधिकारी यांचे कक्षात ठिय्या मांडला. या घटनेची माहिती मिळताच ठाणेदार प्रकाश अहिरे यांनी ताबडतोब आपले पथक घटनास्थळी पाठविले.

पोलीस उपनिरीक्षक राजेश जवरे. अख्तर शेख. रंजीत खेडकर. पोहेकाॅं उमेश सोळंके,सागर मोरे, विजय चव्हाण, मनीष कुलट यांनी मोर्चेकर्‍यांशी संवाद साधून परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर घटनेची माहिती उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे यांना दिली. मात्र ते दौऱ्यावर असल्याने घटनास्थळी हजर राहू शकले नाहीत. तरिही घटनेचे गांभीर्य पाहून त्यांनी ताबडतोब दाखल घेतली. त्यांनी या कामाशी संबंधित सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक सोमवार दिनांक ५ सप्टेंबर रोजी बोलाविली आहे. येथे उल्लेखनीय आहे की, अनेक लोकांनी या घटनेची माहिती देण्याकरता आकोट पोलीस स्टेशनच्या क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयास केला. परंतु पोलीस ठाण्यातून त्यावर कोणताही प्रतिसाद दिला गेला नाही. याबाबत अनेकांनी नाराजी प्रकट केली असून ठाणेदार प्रकाश अहिरे यांनी याकडे आवर्जून लक्ष द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments