संजय आठवले, आकोट
शासनाचे नविन नियमानुसार संजय गांधी, श्रावण बाळ या योजनांसाठी ऊत्पन्नाचे दाखले देणे बंधनकारक केल्याने हे दाखले बनविण्याचे काम युद्धस्तरावर जारी असतानाच अशा एका दाखल्यासंदर्भात प्रहार कार्यकर्त्याने एका लिपिकाशी हमरीतुमरी व दमदाटी करुन शासकिय कामकाजात व्यत्यय आणल्याने आकोट तहसिलदार यांचे निर्देशानुसार महसुल कर्मचा-यानी दिलेल्या तक्रारीवरुन आकोट शहर पोलीसानी तिन जणांचे विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
या संदर्भात महसुल कर्मचा-यानी दिलेल्या तक्रारीनुसार आकोट तहसिलमध्ये संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना ऊत्पन्नाचे दाखले देण्याचे काम प्राधान्याने करण्यात येत आहे. दि. १६जून रोजी दुपारी ३.३० चे सुमारास ऊमेश ढवळे नामक कर्मचारी दाखले तपासण्याचे काम करित होता. तितक्यात तेथे प्रहार कार्यकर्ता अवि घायसुंदर हा तेथे आला. आल्यावर त्याने एका दाखल्याबाबत विचारणा केली. त्यावर ढवळे यानी त्याला पावती मागितली. त्या पावतीवर अर्ज क्रमांक, दिनांक असल्याने अर्ज शोधणे सुलभ होते. घायसुंदर याने ” मला पावती मागतोस? मी कोण आहे ते तुला ठाऊक नाही काय? अशी विचारणा केल्यावर ढवळे यानी पावती असणे गरजेचे आहे असे घायसुंदरने त्यांचे अंगावर जावून व अद्वातद्वा बोलून शिवीगाळ केली. ह्यावेळी त्याचेसोबत आणखी दोघेजण होते.
सदर प्रकरण वाढल्याने सर्व महसुल कर्मचारी तहसिलदार निलेश मडके यांचेकडे गेले. प्रशासकिय कामकाजात व्यत्यय आणून कर्मचा-याना दमदाटी केल्याचे ऐकून त्यानी या संदर्भात पोलीसात तक्रार देण्याचे निर्देश दिले. त्यानुसार संबंधीत कर्मचारी ऊमेश ढवळेव अन्य महसुल कर्मचा-यानी आकोट शहर पोलीसात तक्रार दाखल केली. त्यावरुन आकोट पोलीसानी अवी घायसुंदर अधिक दोघे यांचेविरुद्ध भादवि ३५३,५०४,५०६,३४ अन्वये गुन्हे दाखल केले आहेत.
येथे ऊल्लेखनिय आहे कि, आकोट तहसिलमध्ये विविध १७ पदे रिक्त आहेत. ४ नायब तहसिलदार रिक्त आहेत. एकाचेच भरवशावर कारभार सुरु आहे. बहुतांश कर्मचा-यांकडे आपल्या कामासह दुस-या कामाचाही प्रभार आहे. आकोट तालुका हा जिल्ह्यातील सर्वात मोठा तालूका आहे. दैनंदिन कामे ईथे मोठ्या प्रमाणात आहेत. त्यात आता पेरणीचा हंगाम आहे, शेतक-याना विविध दाखले आणि शाळा सुरु होणार असल्याने विद्यार्थ्यांचेही विविध दाखले अशा कामाचा प्रचंड बोजा कर्मचा-यांवर वाढलेला आहे. त्यात असे वाद निर्माण होत असल्याने कर्मचा-यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. ते निवळण्याकरिता येथिल रिक्त जागा भरणे अतिशय गरजेचे आहे.