आकोट – संजय आठवले
आकोट तालूक्यात विविध शासकिय खरेदी केंद्रांवर सुरु असलेली व नंतर अकस्मात बंद केलेली चना खरेदी ताबडतोब सुरु करण्याची मागणी माजी आमदार संजय गावंडे व शेतकरी पॅनलचे नेत्यानी आकोट उपविभागीय अधिकारी याना तर राष्ट्रवादीचे तालूका अध्यक्ष कैलास गोंडचर यानी राज्याचे अन्न व प्रशासन मंत्री याना निवेदनाद्वारे केली आहे.
सन २०२१-२२ साठी केंद्रशासनातर्फे नाफेडद्वारे राज्यात मार्च २०२२ मध्ये चना खरेदी सुरु झाली. मात्र अकोला जिल्ह्यात ही खरेदी एफसीआयद्वारे करण्यात येत होती. त्यामूळे अकोला जिल्ह्यात आधीच तब्बल २० दिवस ऊशिराने ही खरेदी सुरु झाली. ह्या खरेदीची अंतिम मुदत २९ मे ही होती.
परंतु केंद्र सरकारच्या तुघलकी कारभा-यानी ही खरेदी २३ मे रोजीच बंद केली. त्यानंतर चर्चा होऊन २९ मे रोजी ही खरेदी ३१ मे पासून पुन्हा सुरु करुन १८ जूनपर्यंत संपवावी असे आदेश देण्यात आले. त्यानुसार ही खरेदी सुरु झाली. परंतु अचानक पुन्हा २जून रोजी ही खरेदी बंद करण्यात आली. ही खरेदी बंद झाल्याने आकोट कृउबास खरेदी केंद्रावर २ जून रोजी चना विकणा-या ३५ कास्तकारांची बिले तयार होण्यापासून रोखली गेली.
त्यामूळे शेतक-याचा १२११ क्विंटल चना वांध्यात आला. ह्या सोबतच या खरेदी केंद्रावर नोंदणी केलेले ७०० कास्तकार आपला क्रमांक येण्याची आशा लावून बसलेले आहेत. २ जूनचे सायंकाळी काहीच कल्पना नसताना अकस्मात चना खरेदी बंद झाल्याचे कास्तकाराना ठाऊकच नव्हते. त्यामूळे आकोट कृऊबास मध्ये ३ जून रोजी ६५ लहान मोठी वाहने चना घेवून दाखल झाली. परंतु चना खरेदी बंद झाल्याने ह्या लोकाना बाजार आवारातच थांबावे लागले आहे.
वाहनाच्या प्रकारानुसार त्यांचे भाडे याशिवाय रोज रात्री थांबण्यासाठी त्या वाहनाचे अर्धे भाडे असा आर्थिक भूर्दंड शेतक-याना सहन करावा लागत आहे. या खेरिज दिवस रात्रीच्या रखवालीसाठी ह्या शेतक-याना येणारा खर्च वेगळाच आहे. ही झाली केवळ एका खरेदी केंद्राची स्थिती. अशीच स्थिती तालूक्यातील सर्वच खरेदी केंद्रांवर पहायला मिळत आहे. पावसाळा तोंडावर आहे. मशागतीची कामे जोमाने सुरु आहेत, बि बियाणे, खते, औषधे खरेदी करावयाची आहेत.

पाल्यांची शाळा सुरु होणार आहे. पुस्तके, कापडचोपड ह्यांचीही सोय करावी लागणार आहे. अशातच हे केंद्रीय सुलतानी संकट ऊभे ठाकल्याने तालूक्यातील हजारो क्विंटल चना पडून आहे. शासन शेतक-यासाठी विविध योजना राबविण्याच्या गप्पा तोंडाला फेस येईपर्यंत बोलून दाखवित आहे. मात्र आज रोजी शेतक-याचा चना खरेदीविना पडून आहे. त्याबाबतीत मात्र कुणी निर्णय घेण्यास तयार नाही.
अशी सारी व्यथा आपल्या निवेदनात मांडून माजी आमदार संजय गावंडे व शेतकरी पॅनल नेते डॉ. गजानन महल्ले, डॉ. प्रमोद चोरे, प्रदीप वानखडे, म. बद्रुज्जमा, अॕड. मनोज खंडारे यानी आकोट उपविभागिय अधिकारी याना तर आकोट तालूका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालूका अध्यक्ष कैलास गोंडचर यानी राज्याचे अन्न व प्रशासन मंत्री नाम. राजेंद्र शिंगणे याना ही बंद केलेली चना खरेदी ताबडतोब खरेदी करण्याचे साकडे घातले आहे.