मुंबई – गणेश तळेकर
आपण महामंडळाची संचालकांची सभा याविषयी वर्तमानपत्रातून विविध बातम्या वाचत असाल. तुमचा कोणताही गैरसमज होऊ नये व माझ्यावरील विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून त्या मिटिंग बाबत मी सविस्तर खुलासा करीत आहे.
- सर्वप्रथम मिटिंगची नोटीस कार्यवाह यांनी काढतांना मा. अध्यक्ष यांना विचारून मगच नोटीस काढली पाहिजे असे आपल्या घटनेत लिहिलेले आहे, मा. कार्यवाह सुशांत शेलार यांनी या मिटिंग बाबत माझ्याशी कोणत्याही प्रकारे संपर्क न साधता परस्पर घटनाबाह्य रीतीने मिटिंगचे आयोजन केले आहे.
- सर्व संचालकांना विचारून परस्पर सहमतीने मिटिंग ची तारीख ठरविली जाते, परंतु यावेळी काही निवडक संचालकांना विचारून मिटिंग लावली गेली आहे. आपापल्या पूर्व घोषित कामामुळे काही संचालक हजर राहू शकणार नाहीत.
- आपला कार्यकाळ संपून जवळ जवळ दीड वर्षे झाली आहेत सध्या आपण काळजीवाहू म्हणून काम पाहत आहोत, अश्यावेळी कोणताही धोरणात्मक निर्णय आपण घेऊ शकत नाही, परंतु रुटीन वर्क मधील सर्व व्यवहार आपण पार पाडत आहोत, ज्याचा फायदा सभासदांना होतच आहे. आता अतिशय महत्वाचा विषय आहे, की निवडणुका होऊन नूतन कार्यकारिणीने कारभार हाती घ्यावा. परंतु मा. कार्यवाह यांनी काढलेल्या नोटीस मध्ये त्यांनी कुठेही निवणुकीचा विषय घेतलेला नाही. त्यामुळे या मिटिंगचा त्यांचा हेतूच कुटील आहे हे ध्यानात येत आहे.
- विषय पत्रिकेवरील विषयात माजी व आजी संचालकांचे रद्द केलेल्या सभासदत्वावर चर्चा करून निर्णय घेणे हा विषय व प्रमुख व्यवस्थापक श्री. बोरगावकर यांच्या निलंबनविषयी चर्चा करून निर्णय घेणे हा विषय प्राधान्याने घेतला आहे, परंतु हे संचालक व बोरगावकर याच प्रकरणात उच्च न्यायालयात गेलेले आहेत व प्रकरण न्याय प्रविष्ट असताना त्यावर चर्चा करणे व निर्णय घेणे म्हणजे न्यायालयाचा अवमान होतो, असा न्यायालयाचा अवमान करणे मी व माझ्या काही सहकाऱ्यांना अजिबात मान्य नाही, त्यामुळे आम्ही या मिटिंगला हजर राहू शकत नाहीत.
- वर्तमानपत्रातील बातम्यांनुसार असे लक्षात येते की, संबंधितांना माझ्यावर अविश्वास ठराव आणून माझं पद घालवायचे आहे. परंतु अ. भा. म. चित्रपट महामंडळाच्या घटनेत व चॅरिटी कायद्यात अध्यक्षांवर अविश्वास ठराव आणण्याचे कोणतेही प्रावधन नाही. त्यामुळे अनाधिकाराने व अनैतिक पद्धतीने जरी माझ्यावर अविश्वास ठराव आणला तरी पुढील निवडणुकीपर्यंत मीच अध्यक्ष असणार आहे.
- पण कोरोना काळामुळे अधिक काळ आम्ही कार्यकरिणीवर आहोत, सध्या आमचा कार्यकाळ संपूनही एक वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटलेला आहे. अश्यावेळी नैसर्गिक न्यायानुसार व लोकशाही परंपरेनुसार निवणूक तातडीने लावणे आवश्यक आहे, व त्यासाठी तातडीने वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करणे आवश्यक आहे.परंतु मा. कार्यवाह यांनी वार्षिक सर्वसाधारण सभा हा विषयच विषय पत्रिकेत मांडलेला नाही. अध्यक्षांच्या संमतीने ऐनवेळेच्या विषयात हा विषय घेता येत नाही याचे आकलन मा. कार्यवाह व काही संचालकांना झालेले नाही. निवडणूकच न घेणे हा ह्यांचा हेतू यामध्ये स्पष्ट दिसून येतो.
- मिटिंगच्या विषयांतर्गत कोविड काळात जमा झालेल्या व वितरित केलेल्या मदतीविषयी निर्णय घेणे हा एक विषय आहे. कोविड काळात एका सहृदयी व्यक्तीने आपल्या बँक खात्यात जमा केलेले रु.१३००००/- वगळता इतर सर्व रक्कम चेकने, ड्राफ्टने, ऑनलाईन अशीच मदत बँकेत जमा झाली आहे, अशी एकूण जवळपास रु. २७०००००/- (रु.सत्तावीस लाख ) जमा झालेले होते. ज्या ज्या दात्यांनी सभासदांना मदत केली त्यांना त्याची रक्कम कोणाला वाटप केली गेली हे सभासदांच्या नाव, पत्त्यनिशी यादी दिली गेली आहे.
- सभासदांना बँकेद्वारे त्यांच्या खात्यात प्रत्येकी रु.२०००/- व ज्यांना किट दिले गेले अश्या काही सभासदांना प्रत्येकी रु.१०००/- अशी रक्कम बँकेद्वारे ( आरटीजीएस ने) पाठविली गेली, एकूण रु. ४२,००,०००/- चे वाटप केले आहे. कुपन्स व किराणा किट हे मिळवून, तयार करून वाटप करण्यात आले, जे संचालक यावर संशय घेऊन चौकशीची मागणी करीत आहेत ते संचालक कोरोना काळात कधीही सभासदांना मदत करायला स्वतःच्या जिवाच्या भीतीने बाहेर पडले नव्हते, हे लक्षात घ्या.
सन 2018-19, 2019-20 व 2020-21 या वर्षीच्या ताळेबंद व खर्च उत्पन्न पत्रकावर चर्चा व निर्णय हा एक विषय विषयपत्रिकेवर दिसतो आहे. चॅरिटी कायदा व इन्कमटॅक्स कायदा यानुसार ऑडिट झालेले रिपोर्ट त्या त्या वेळी मा. कार्यवाह यांच्या सहीने विहित कालावधीत चॅरिटी व इन्कमटॅक्स डिपार्टमेंटला सबमिट केलेले आहेत. व त्यामुळेच महामंडळाला होणारा लाखो रुपयांचा दंड वाचला आहे, तसेच वेळेत रिपोर्ट सादर झाले नसते तर इन्कमटॅक्स डिपार्टमेंटने महामंडळाला दिलेल्या सवलतीही रद्द झाल्या असत्या, परंतु आपण असे होऊ दिले नाही. आमच्या अंतर्गत भांडणाचा तोटा महामंडळ व पर्यायाने सभासद यांना होऊ नये हीच भावना मनात होती व आहे.
बाकीही काही नेहमीचे विषय आहेत.
परंतु मी अध्यक्ष झाल्यानंतर गावोगावच्या व तळागाळातील कलावंतांना, तंत्रज्ञांना, कामगारांना व निर्मात्यांना महामंडळाच्या मुख्य प्रवाहात आणले, गेली 6 वर्षे स्वतःच्या व्यवसायाकडे दुर्लक्ष करून, जीवाची पर्वा न करता प्रामाणिकपणे महामंडळाच्या उन्नती साठी झटलो आहे, याची जाणीव सभासद पदोपदी करून देतातच, परंतु दुर्दैवाने खुर्चीची आस काहींना लागल्याने आमच्यातीलच काही लोकांना मात्र हे उमगलेच नाही.
डिपार्टमेंटने महामंडळाला दिलेल्या सवलतीही रद्द झाल्या असत्या, परंतु आपण असे होऊ दिले नाही. आमच्या अंतर्गत भांडणाचा तोटा महामंडळ व पर्यायाने सभासद यांना होऊ नये हीच भावना मनात होती व आहे. बाकीही काही नेहमीचे विषय आहेत. परंतु मी अध्यक्ष झाल्यानंतर गावोगावच्या व तळागाळातील कलावंतांना, तंत्रज्ञांना, कामगारांना व निर्मात्यांना महामंडळाच्या मुख्य प्रवाहात आणले, गेली 6 वर्षे स्वतःच्या व्यवसायाकडे दुर्लक्ष करून, जीवाची पर्वा न करता प्रामाणिकपणे महामंडळाच्या उन्नती साठी झटलो आहे, याची जाणीव सभासद पदोपदी करून देतातच, परंतु दुर्दैवाने खुर्चीची आस काहींना लागल्याने आमच्यातीलच काही लोकांना मात्र हे उमगलेच नाही.