Homeराज्यजालना जिल्ह्यातील अंबड शासकीय आयटीआयमध्ये ३ नवीन व्यवसाय अभ्यासक्रम सुरु करण्यास मान्यता...

जालना जिल्ह्यातील अंबड शासकीय आयटीआयमध्ये ३ नवीन व्यवसाय अभ्यासक्रम सुरु करण्यास मान्यता – कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री राजेश टोपे यांची माहिती…

मुंबई – अंबड (जि. जालना) येथील तालुकास्तरीय शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) सन २०२२-२३ या वर्षापासून ३ नवीन व्यवसाय अभ्यासक्रमाच्या तुकड्या सुरु करण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

नवीन तंत्रज्ञानावर आधारीत औद्योगिक आस्थापनांच्या मागणीनुसार या आयटीआयमध्ये संधाता, सोलर टेक्निशियन व इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक या नवीन अभ्यासक्रमांच्या ५ तुकड्या सुरु करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्री श्री. टोपे म्हणाले की, राज्यात कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यात औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा मोठा सहभाग आहे. जागतिक दर्जाचे व व्यवसायाभिमुख, आस्थापनांच्या मागणीनुसार कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यात औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा मोठा वाटा आहे. आर्थिक उदारीकरणामुळे राज्यात औद्योगिकरण वेगाने वाढत आहे.

औद्योगिक तंत्रज्ञान उत्पादनाच्या बदलत्या प्रक्रियामुळे उद्योगधंद्यांना कुशल मनुष्यबळाची गरज वाढत आहे. तसेच नवीन तंत्रज्ञानावर आधारित औद्योगिक आस्थापनांच्या मागणीनुसार नवीन अभ्यासक्रमांचा समावेश करणेही गरजेचे आहे. त्याच अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

अंबड आयटीआयमध्ये आजमितीस ८ व्यवसायाच्या १६ तुकड्या कार्यरत असून संस्थेत एकुण ३१६ प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत. सद्यस्थितीत मराठवाड्यात सौरउर्जेवर आधारित व अनुषंगिक कामांशी निगडीत औद्योगिक आस्थापनांना मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची गरज निर्माण झाली आहे.

स्थानिक गरजा व औद्योगिक आस्थापनांची मागणी लक्षात घेता तसेच रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध असलेल्या या ३ नवीन अभ्यासक्रमाच्या तुकड्या अंबड आयटीआयमध्ये सुरु करण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने जालना जिल्ह्यातील गरजू विद्यार्थ्याचे कौशल्य विकसित करुन रोजगार निर्मिती करण्यासाठी मदत होऊ शकेल, असे मंत्री श्री. टोपे यांनी सांगितले.

संधाता अभ्यासक्रमाची १ तुकडी व सोलर टेक्निशियन आणि इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक या अभ्यासक्रमांच्या प्रत्येकी २ तुकड्या चालू शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्यास मान्यता देण्यात आल्याचे मंत्री श्री.टोपे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments