शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडात अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे आमदार नितीन देशमुख हे सुद्धा सामील असल्याचे समोर आले आहे. तर त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने सूरत येथील सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. अश्यातच पत्नी प्रांजली देशमुख यांनी अकोल्यात पोलीस तक्रार दाखल केली आहे.
एकनाथ शिंदे यांनी अचानक पुकारलेल्या बंडात सामील असलेल्या त्यांच्यासह १३ आमदारांना गुजरातमधील सूरत येथील हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते, तर अश्यातच आमदार नितीन देशमुख यांच्या छातीत दुखायला लागल्याने त्यांना गुजरात मधील एका रुग्णालयात अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
तर शिवसेना आमदार नितीन देशमुख हे बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या पत्नी प्रांजली देशमुख यांनी अकोला पोलिसांत दिली आहे. दिलेल्या तक्रारीत, मतदानानंतर सायंकाळी ६ वाजता मुंबईहून अकोल्याला येत असल्याचं सांगितल्यानंतर फोन बंद, कोणताही संपर्क नाही, सकाळपर्यंत संपर्क न झाल्याने बेपत्ता असल्याची अकोला सिव्हील लाईन पोलिसात तक्रार दाखल केली आहे…