प्रतिनिधी:
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रक्तपेढी, नागपूर येथे १४ जूनला विविध उपक्रमांच्या माध्यमातून जागतिक रक्तदाता दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळच्या सत्रात रक्तदानाचा संदेश देणाऱ्या रांगोळीने रक्तपेढी परिसर सजविण्यात आला. रुग्णालय परिसरात भव्य रक्तदान जागृती रॅली काढून नागरिकांना ऐच्छिक रक्तदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले तसेच ओ.पी.डी. परिसरातील लोकांना रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी नर्सिंगच्या ५० प्रशिक्षणार्थींचा उत्स्फूर्त सहभाग होता. याप्रसंगी वैद्यकीय अधिष्ठाता श्रीमती डॉ. अभिचंदानी यांनी उपस्थितांना संबोधित केले.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात जिल्ह्यातील विविध भागात सातत्याने रक्तदान शिबीरांचे आयोजन करून रुग्णालयातील गरजू रुग्णांना रक्तपुरवठा करण्यास सर्वतोपरी सहकार्य करणाऱ्या शिबीर आयोजकांचा प्रमुख पाहुणे डॉ. बळवंत कोवे (एचओडी पॅथॉलॉजी), डॉ. अमित अग्रवाल (प्रभारी रक्तपेढी आणि वैद्यकीय अधीक्षक, आयजीजीएमसीएच) यांनी बोलतांना मानवी जीवनात रक्तदानाचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले.
यावेळी बीटीओ डॉ. सय्यद वसीम, बीटीओ डॉ. सागर गवई, चेतन मेश्राम (एसएसएस), यांचे शुभहस्ते साक्षोधन कडबे (आकाशझेप फाऊंडेशन, रामटेक), संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन, डेरा सच्चा सौदा, जमात-ए-इस्लामी हिंद, प्रीतम मेश्राम (करुणा फाऊंडेशन), स्व फाउंडेशन, नॅशनल नेटवर्क ऑफ बुद्धिस्ट युथ, महाराष्ट्र नाभिक महामंडळ एकता मंच आणि पीस फॉर पीस या संस्थांच्या प्रतिनिधींना शाल, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. जागतिक रक्तदाता दिनानिमित्त १६ व्यक्तींनी ऐच्छिक रक्तदान करून मानवतेचा संदेश दिला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सिस्टर वंदना भगत, अनिल खोटे समस्त रक्तपेढी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.