कोल्हापूर – राजेद्र ढाले
राधानगरी ,शाहूवाडी, गगनबावडासह कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून मार्केटयार्ड येथील संच वितरण कार्यालयात आलेल्या बांधकाम कामगारांना बांधकाम कामगार कल्याण मंडळामार्फत (शासनामार्फत) मिळणारे सुरक्षा संच व अत्यावश्यक संच तांत्रिक कारणामुळे न मिळाल्याने रिकाम्या हाताने परत जावे लागले.
काम बुडवून हातावरील पोट असणारे बांधकाम कामगार संच मिळेल या अपेक्षेने सकाळी सकाळी कोल्हापूरला येण्यासाठी निघाले होते. काहीजण मिळेल त्या वाहनाने, एसटीने व खाजगी वाहने करून या ठिकाणी हजर झाले होते. परंतु वेबसाईट बंद आहे व किट मधील साहित्य कमी असल्याच्या कारणावरून साहित्य वाटप बंद करण्यात आले होते. त्यामुळे रोजंदारीवर राहणाऱ्यांना आजच्या या पगारावर पाणी सोडावे लागले तसेच प्रवास खर्चाचाही भुर्दंड सोसावा लागला.
काही महिन्यांपूर्वी बांधकाम कामगारांनी बांधकाम कल्याण मंडळाकडे ऑनलाइन नोंदणी केली होती. परंतु कोल्हापुर उत्तर मधील मध्यावधी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किटचे वाटप थांबवण्यात आले होते. बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज किट वाटप करण्यात येणार आहे असे समजल्यामुळे अनेकांनी हातातील काम बुडवून किट घेण्यासाठी गर्दी केली होती.
परंतु याठिकाणी आल्यानंतर संबंधित ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांनी पेटी मधील साहित्य संपले असून नंतर या असे सांगितले. तसेच संबंधित कर्मचाऱ्यांकडून बांधकाम कामगारांच्या प्रश्नांना व्यवस्थित उत्तरे मिळत नसल्यामुळे ठेकेदाराच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करण्यात येत होती.
पेट्यांनी गोडाऊन फुल पण…..
किट वाटप करण्यात येणाऱ्या ठिकाणी एक मोठे गोडाऊन असून हे गोडाऊन पत्र्याच्या पेट्यांनी भरलेले होते. परंतु यामध्ये साहित्य नसल्याचे संबंधितांनी सांगितले. परंतु याबाबत बांधकाम कामगारां मध्ये उलटसुलट चर्चा सुरू होती.