Thursday, April 25, 2024
Homeकृषीराज्यातील २८१ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर...राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण...

राज्यातील २८१ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर…राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांची माहिती.

Share

आकोट – संजय आठवले

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून राज्यातील ३१ डिसेंबर २०२२ अखेर निवडणूकीस पात्र २८१ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून याबाबतची प्रक्रिया बुधवार ७ सप्टेंबर पासून सुरू होत असल्याची माहिती प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी दिली आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे मतदान २९ जानेवारी २०२३ रोजी व मतमोजणी ३० जानेवारी २०२३ रोजी होणार आहे.

प्राधिकरणाने ६ आणि २१ ऑक्टोबर २०२१ रोजीच्या आदेशानुसार निवडणूकीस पात्र कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूक प्रक्रिया सुरु केल्या होत्या. मात्र, कृषी पत संस्थांच्या निवडणूकीनंतर कृषी उत्पन्न बाजार समितींच्या निवडणूका सुरु करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर १३ याचिका दाखल झाल्या होत्या. त्याअनुषंगाने उच्च न्यायालयाने निवडणूकीस पात्र विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या निवडणूका तातडीने पूर्ण करुन त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितींच्या निवडणूका पूर्ण करण्याबाबत १८ नोव्हेंबर २०२१ रोजी आदेश दिले.

त्यानुसार आवश्यक कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर प्राधिकरणाने आज निवडणूक कायक्रम जाहीर केला आहे. बाजार समितीच्या निवडणूकीकरीता बाजार क्षेत्रातील कार्यरत प्राथमिक कृषी पत संस्था, बहुउद्देशीय सहकारी संस्था व ग्रामपंचायत यांचे सदस्य मतदार असल्यामुळे या सदस्यांची सूची २७ सप्टेंबर २०२२ पर्यंत जिल्हा निवडणूक अधिकारी (कृ.उ.बा.स.) यांच्याकडे सादर करण्याचे निर्देश संबंधित जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था व गट विकास अधिकारी यांना दिले आहेत. याशिवाय बाजार क्षेत्रातील परवाना धारक व्यापारी, आडते व हमाल, तोलाईदार हे बाजार समितीचे मतदार असल्यामुळे या मतदारांची यादी १ नोव्हेंबर २०२२ पर्यंत जिल्हा निवडणूक अधिकारी (कृ.उ.बा.स.) यांच्याकडे सादर करण्याचे निर्देश संबंधित बाजार समित्यांना दिलेले आहेत.

कृषी उत्पन्न बाजार समित्यांची प्रारूप मतदार यादी १४ नोव्हेंबर रोजी आणि अंतिम मतदार यादी ७ डिसेंबर २०२२ रोजी प्रसिद्ध होणार आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे मतदान २९ जानेवारी २०२३ रोजी व मतमोजणी ३० जानेवारी २०२३ रोजी होणार आहे.

दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूक घेण्यासंदर्भात उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ औरंगाबाद, नागपूर व मुंबई येथे मोठ्या प्रमाणात याचिका दाखल झालेल्या असता उच्च न्यायालयाने श्रीरामपूर, राहता, जाफ्राबाद, भोकरदन, वसमत व धारुर या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूक प्रक्रिया विनिर्दिष्ट कालावधीत पूर्ण करणेबाबत आदेश दिले. त्यानुसार प्राधिकरणाने या बाजार समित्यांच्या निवडणूका २ सप्टेंबर २०२२ रोजीच्या आदेशानुसार सुरु केलेल्या आहेत. या बाजार समित्यांचे मतदान व मतमोजणी अनुक्रमे १८ डिसेंबर व १९ डिसेंबर २०२२ रोजी होणार असल्याची माहितीही डॉ.पाटील यांनी दिली आहे.

संभाव्य मतदार यादी व निवडणू‍क कार्यक्रम
मतदार यादी कार्यक्रम

जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था व गटविकास अधिकारी यांच्याकडून सदस्य सुची मागवणे- २७ सप्टेंबर २०२२ पर्यंत, प्रारूप मतदार यादी तयार करण्याकरीता सदस्य सूची बाजार समिती सचिवाकडे सुपूर्द करणे- ३ ऑक्टोबर २०२२, बाजार समिती सचिवाने नमुना ४ मध्ये प्रारूप मतदार यादी तयार करणे- ३ ते ३१ ऑक्टोबर २०२२, बाजार समिती सचिवाने नमुना ४ मधील प्रारूप मतदार यादी जिल्हा निवडणूक अधिकारी (कृ.उ.बा.स) यांच्याकडे सादर करणे- १ नोव्हेंबर २०२२, जिल्हा निवडणूक अधिकारी (कृ.उ.बा.स) यांनी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे- १४ नोव्हेंबर २०२२, प्रारूप मतदार यादीवर आक्षेप/ हरकती मागवणे- १४ ते २३ नोव्हेंबर, प्राप्त आक्षेप/हरकतींवर निर्णय घेणे- २३ नोव्हेंबर ते २ डिसेंबर, अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे- ७ डिसेंबर २०२२

निवडणू‍क कार्यक्रम
निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे- २३ डिसेंबर २०२२, नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा कालावधी- २३ ते २९ डिसेंबर २०२२, नामनिर्देशनपत्रांच्या छाननीचा दिनांक- ३० डिसेंबर २०२२, छाननीनंतर वैध नामनिर्देशनपत्रांच्या प्रसिद्धीचा दिनांक- २ जानेवारी २०२३, उमेदवारी मागे घेण्याचा कालावधी- २ ते १६ जानेवारी २०२३, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्याचा व निशाणी वाटप करण्याचा दिनांक- १७ जानेवारी २०२३, मतदान- २९ जानेवारी रोजी आणि मतमोजणी ३० जानेवारी २०२३ रोजी. मतमोजणीनंतर लगेचच निकाल जाहीर करण्यात येतील, असे निवडणूक कार्यक्रमात नमूद करण्यात आले आहे.


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: