Homeग्रामीणमहाराष्ट्राच्या १७ जिल्ह्यातील ५१ तालुक्यामधील ६०८ ग्रामपंचायतच्या निवडणुका घोषित...आचारसंहिता जारी...१८ सप्टेंबरला मतदान...

महाराष्ट्राच्या १७ जिल्ह्यातील ५१ तालुक्यामधील ६०८ ग्रामपंचायतच्या निवडणुका घोषित…आचारसंहिता जारी…१८ सप्टेंबरला मतदान व १९ सप्टेंबरला निकाल….

संजय आठवले, आकोट

सर न्यायालयाचे निर्देशानुसार राज्यातील पर्जन्यमानाच्या तालुका निहाय आकडेवारीचे अवलोकन करून तथा पूर परिस्थिती व अतिवृष्टी यांनी बाधित तालुके वगळून निवडणूक आयोगाने राज्याच्या १७ जिल्ह्यातील ५१ तालुक्यामधील ६०८ ग्रामपंचायतच्या निवडणुका घोषित केल्या आहेत. या निवडणुकांचा प्रत्यक्ष कार्यक्रम १८ ऑगस्ट रोजी जाहीर होणार असून त्या भागात आजपासुनच आचारसंहिता जारी झाली आहे. या कार्यक्रमानुसार दिनांक २४ ऑगस्ट ते १ सप्टेंबर पर्यंत नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा कालावधी असून दिनांक १८ सप्टेंबर रोजी मतदान व १९ सप्टेंबर रोजी मतगणना निर्धारित करण्यात आली आहे. या ग्रामपंचायतींच्या सरपंचाची निवड थेट जनतेतून होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने विशेष अनुमती याचिका क्र. १९७५६/२०२१ व दिनांक ०४/०५/२०२२ रोजीच्या अंतरिम आदेशामध्ये दिनांक १०/०३/२०२२ रोजीच्या टप्प्यापासून पुढील प्रक्रिया करण्याचे आदेश दिले आहेत.आयोगाने दिनांक ०३/०६/२०२२ रोजी दिलेल्या आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमानुसार माहे जानेवारी २०२१ ते एप्रिल २०२२ मध्ये मुदत संपलेल्या, माहे मे २०२२ ते डिसेंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या, नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायती तसेच मागील निवडणूकीत संपूर्ण निवडणूक कार्यक्रम रद्द केलेल्या ग्रामपंचायती अशा एकूण ९७०२ ग्रामपंचायतींची आरक्षणासहित अंतिम प्रभाग रचना दिनांक २१.६.२०२२ रोजी प्रसिद्ध केलेली आहे.

याच दरम्यान सर्वोच्च न्यायालयामधील विशेष अनुमती याचिका क्र. १९७५६/२०२१ मध्ये दि. १२ जुलै, २०२२ रोजी झालेल्या सुनावणीच्यावेळी शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाचे प्रमाण निश्चित करण्याकरिता गठीत केलेल्या समर्पित मागासवर्ग आयोगाने आवश्यक त्या बाबींची पूर्तता करुन दि. ७ जुलै २०२२ रोजी आपला अहवाल शासनास सादर केल्याची बाब शासनाने अर्ज क्र. ९२६९५ / २०२२ अन्वये सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने दि. २० जुलै, २०२२ रोजीच्या सुनावणीत राज्य निवडणूका आयोगाने यापुढील निवडणुकांमध्ये समर्पित मागासवर्ग आयोगाने केलेल्या शिफारशी विचारात घेऊन पुढील निवडणुका घेण्याबाबत आदेश दिले आहेत.

त्यानुसार पावसाचे प्रमाण कमी असलेल्या एकूण १७ जिल्ह्यांच्या ५१ तालुक्यांतील ६०८ ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांसह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १८ सप्टेंबर २०२२ रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून १९ सप्टेंबर २०२२ रोजी मतमोजणी होईल. अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली.

त्यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या १७ मे २०२२ रोजीच्या आदेशानुसार पावसामुळे निवडणूक कार्यक्रम बाधित होण्याची शक्यता कमी असलेले ५१ तालुके निवडून तेथील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याचबरोबर निवडणूक कार्यक्रमाच्या कोणत्याही टप्प्यावर अतिवृष्टी किंवा पूर परिस्थितीसारखी नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास त्याबाबत राज्य निवडणूक आयोगास तात्काळ अहवाल सादर करावा, असे आदेशही संबंधित जिल्हाधिकान्यांना देण्यात आले आहेत.

घोषित निवडणूक कार्यक्रमानुसार संबंधित तहसीलदार १८ ऑगस्ट २०२२ रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्रे २४ ऑगस्ट २०२२ ते १ सप्टेंबर २०२२ या कालावधीत दाखल करण्यात येतील. शासकीय सुट्टीमुळे २७, २८ व ३१ ऑगस्ट २०२२ रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी २ सप्टेंबर २०२२ रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत ६ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असेल. मतदान १८ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. मतमोजणी १९ सप्टेंबर २०२२ रोजी होईल. समर्पित मागासवर्ग आयोगाने शिफारस केलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात या निवडणुकांसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा देय आहेत असेही ते म्हणाले.

विविध जिल्ह्यांत निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हा व तालुकानिहाय संख्या: नंदुरबार: शहादा- ७४ व नंदुरबार- ७५. धुळे शिरपूर- ३३. जळगाव: चोपडा- ११ व यावल- ०२. बुलढाणा: जळगाव (जामोद) – ०१, संग्रामपूर- ०१, नांदुरा ०१, चिखली- ०३ व लोणार- ०२. अकोला: आकोट ०७ व बाळापूर ०१. वाशीम : कारंजा ०४. अमरावती: धारणी ०१, तिवसा ०४ अमरावती- ०१ व चांदुर रेल्वे- ०१. यवतमाळ : बाभुळगाव- ०२, कळंब- ०२, यवतमाळ- ०३. महागाव- ०१, आर्णी ०४. घाटंजी ०६, केळापूर २५, राळेगाव- ११, मोरेगाव- ११ व झरी जामणी ०८. नांदेड: माहूर- २४, किनवट- ४७, अर्धापूर- ०१, मुदखेड – ०३, नायगाव (खैरगाव)- ०४, लोहा- ०५, कंधार- ०४, मुखेड- ०५. व देगलूर- ०१. हिंगोली: ( औंढा नागनाथ ) – ०६. परभणी: जिंतूर ०१ व पालम ०४, नाशिक: कळवण- २२, दिंडोरी- ५० व नाशिक १७. पुणे: जुन्नर- ३८, आंबेगाव- १८, खेड-०५ व भोर- ०२. अहमदनगर: अकोले- ४५. लातूर: अहमदपूर ०१. सातारा: वाई – ०१ व सातारा- ०८. व कोल्हापूर: कागल- ०१. एकूण ६०८ .

ह्या ६०८ ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अकोला जिल्ह्यातील आकोट व बाळापूर या दोन तालुक्यांचा समावेश झालेला आहे. त्यातील आकोट तालुक्यातील पोपटखेड, धारूर रामापूर, कासोद शिरपूर, अमोना, धारगड, गुलर घाट व सोमठाणा या सात ग्रामपंचायती तर बाळापुर तालुक्यातील केवळ एक अशा आठ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments