Thursday, March 28, 2024
Homeराजकीयहिवरखेडकरांनी ठोठावले संघाचे दार….संघाचे जिल्हा कार्यवाह मोहन आसरकर यांना दिले निवेदन…

हिवरखेडकरांनी ठोठावले संघाचे दार….संघाचे जिल्हा कार्यवाह मोहन आसरकर यांना दिले निवेदन…

Share

आकोट – संजय आठवले

हिवरखेड ग्रामपंचायतचे नगरपंचायत मध्ये रूपांतर होण्याकरिता हिवरखेडकर सर्वच बाजूंनी जोर लावीत असून त्याच अनुषंगाने त्यांनी आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दार ठोठावले आहे. अकोला जिल्ह्याचे संघ कार्यवाह मोहन आसरकर यांना हिवरखेड वासियांतर्फे निवेदन देण्यात आले आहे. त्यावर सकारात्मक पाऊल उचलण्यात येणार असल्याचे आसरकरांनी निवेदनकर्त्यांना आश्वासित केल्याची खात्रीलायक माहिती आहे.

हिवरखेड ग्रामपंचायत नगरपंचायत मध्ये रूपांतरित करण्याचा मुद्दा अद्यापही तापलेलाच आहे. त्याकरिता मिळेल तेथून मदत घेण्याकरिता हिवरखेडकर प्रयासरत आहेत. त्याच अनुषंगाने पदवीधर मतदार संघाचे भाजपचे उमेदवार डॉक्टर रणजीत पाटील यांनाही हिवरखेडकरांनी मदतीचे आवाहन केले आहे.

परंतु हिवरखेड वासियांच्या जनमताचा आदर करावा तर स्वपक्षीय आमदार भारसाखळे दुखावतात आणि जनमताच अनादर केल्यास मतदार खफा होतात, अशा दू्विधेत डॉक्टर पाटील सापडले आहेत. त्यामुळे त्यांना प्रकटपणे कोणत्याही बाजूचे समर्थन करणे जड जात आहे. तरीही त्यांनी मतदानानंतर याप्रकरणी मदत करण्याबाबत हिवरखेडकरांना शब्द दिल्याचे ऐकिवात आहे.

येथे उल्लेखनिय आहे की, वर्तमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गत मविआ सरकारमध्ये नगर विकास मंत्री होते. त्यावेळी हिवरखेड नगरपंचायत होण्याची प्रक्रिया त्यांचेच आदेशाने सुरू झाली होती. परंतु सत्ता बदलानंतर मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनीच या प्रक्रियेवर “रोक” लावलेली आहे. यामागील उद्देश्य केवळ आणि केवळ स्थानिक आमदार भारसाखळे यांची मर्जी राखण्याचाच आहे. त्यामुळे वर्तमान मुख्यमंत्री शिंदे हे जनमताचा आदर करतात हे म्हणणे वृथा ठरले आहे.

म्हणून ह्या प्रक्रियेवरील स्थगिती उठवून तिला गतिमान करण्याकरिता मुख्यमंत्री शिंदे यांची अथवा उपमुख्यमंत्री फडणवीस यांची मर्जी संपादन करणे अगत्याचे आहे. परंतु ह्या करिता तितक्याच तोलामोलाचा मोहरा मिळणेही गरजेचे आहे. सोबतच सद्यस्थितीत राज्यातील पाच जागांच्या विधानपरिषद निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यानिमित्ताने आचारसंहितेचा अमल जारी आहे. अशा स्थितीत असा धोरणात्मक निर्णय घेता येत नाही.

आचारसंहिता पूर्णत: शिथील झाल्यावरच याबाबत कार्यवाही होऊ शकते. परंतु मुख्य व्यायामापूर्वी शरीरात उष्णता निर्माण करणारी प्राथमिक कसरत मात्र करता येऊ शकते. म्हणजेच याबाबत सत्य कथन करून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना वास्तविकता अवगत करविता येऊ शकते. जेणेकरून प्रकरणातील सत्यता जाणून त्यांना पुढील कार्यवाही करणे सुलभ होईल.

त्यामुळेच हिवरखेडकरांच्या आशाळभूत नजरांनी एक तोलामोलाचा मोहरा हुडकून काढला. तो म्हणजे भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह मोहन आसरकर. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही संघ कार्यकर्ता आहेत. त्यामुळे त्यांचेशी आसरकरांचा सलोखा आहे. त्यांच्या शब्दाला फडणवीसांकडे मान आहे. म्हणूनच हिवरखेड नगरपंचायतीच्या पारड्यात आसरकरांचे वजन प्राप्त करण्याकरिता हिवरखेडकरांनी त्यांची थेट भेट घेऊन आपले गाऱ्हाणे त्यांचे कानी घातले आहे.

आपला हा आक्रोश मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे कानी घालण्याचे साकडे या लोकांनी आसरकरांना घातले आहे. जनमताचा आदर करून माणसे जोडणारा माणूस म्हणून त्यांचा समाजात लौकिक आहे. ह्या लौकिकाचा आपल्याला लाभ होईल अशी हिवरखेडकरांना आशा आहे. त्यामुळे एकीकडे जनमताला ठोकरणारा विकास पुरुष तर दुसरीकडे जनमानसाला आपलेसे करणारा माणूस असे द्वंद्व निर्माण झाल्यासारखे वाटते.

याप्रकरणी आपण सकारात्मक पाऊल उचलू असे हिवरखेडकरांना मोहन आसरकर यांनी आश्वासित केल्याचे ऐकिवात आहे. त्यांचेशी संपर्क साधला असता, हिवरखेडकरांनी आपल्याला निवेदन दिल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला. त्यामुळे राजकीय सत्तेचा दुरुपयोग करून आमदार भारसाखळे यांनी हिवरखेड नगरपंचायतीचे बंद केलेले दार संघाच्या “कॉल बेल”ने उघडते काय? हे येणारा काळच ठरवणार आहे.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: