Thursday, April 18, 2024
Homeगुन्हेगारीसौर ऊर्जा प्रकल्प तळेगाव बुद्रुक येथे वन्य पशूंची शिकार, वन्य पशूंचे अवशेष...

सौर ऊर्जा प्रकल्प तळेगाव बुद्रुक येथे वन्य पशूंची शिकार, वन्य पशूंचे अवशेष जप्त, तिघांना अटक, १३ जण फरार…

Share

आकोट – संजय आठवले

तेल्हारा तालुक्यातील तळेगाव बुद्रुक येथील सौर ऊर्जा प्रकल्प स्थळी कुंपणाच्या तारेला विद्युत करंट लावून वन्य प्राण्यांची शिकार होत असल्याचे तक्रारीवरून प्रादेशिक वनविभाग अकोलाचे अधिकाऱ्यांनी ह्या प्रकल्पातील तिघांना ताब्यात घेतल्यानंतर तेल्हारा न्यायालयाने या तिघांना एक दिवसाची वन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील १३ आरोपी फरार झाले असून या घटनाक्रमाशी आपला काही संबंध नसल्याचे सांगत सदर कंपनीने हात वर केले आहेत.

तेल्हारा तालुक्यातील तळेगाव बुद्रुक येथे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झालेला आहे. शंभर एकर परिसरात हा प्रकल्प उभा केलेला आहे. सोलर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, इंडिगो जनरेशन प्रायव्हेट लिमिटेड, आयरन हाइड जनरेशन प्रायव्हेट लिमिटेड अशा तीन कंपन्यांचा हा संयुक्त प्रकल्प आहे. या ठिकाणी सौरभ नलावडे व प्रभात सिंग ठाकूर हे दोन इंजिनियर मुक्कामी राहत आहेत. त्यांच्या सोबतीला १५/१६ सुरक्षा रक्षक तैनात केले गेले आहेत.

अशा स्थितीत या ठिकाणी प्रकल्पाच्या कुंपणाच्या तारेला विद्युत करंट लावून या ठिकाणी वन्य प्राण्यांची शिकार केल्या जात असल्याची तक्रार उपवनसंरक्षक वनविभाग अकोला यांचे कार्यालयाकडे दाखल झाली. या तक्रारीचे चौकशी करता आकोट वनपाल आर. टी. जगताप व वनरक्षक सी. एम. तायडे हे प्रकल्प स्थळी गेले. त्या ठिकाणी त्यांनी तपासणी केली असता त्यांना हरिणांचे चामडे, काळवीटांच्या कवट्या व मोरांची पिसे आढळून आली. त्यांनी हे अवशेष जप्त करून पंचनामा केला असता प्रकल्पातील एकानेही त्यावर स्वाक्षरी केली नाही.

ऊलट अधिकारी व कर्मचारी यांच्यावर अप्रत्यक्ष दबाव आणण्याचा प्रयास केला. त्यामुळे हे चौकशी पथक तेथून परत गेले. त्यानंतर प्रादेशिक वनविभाग अकोलाचे वनपरिक्षेत्र अधिकारी आर. एन. ओवे हे स्वतः घटनास्थळी गेले. तेव्हा त्या ठिकाणी केवळ सौरभ नलावडे व प्रभात सिंग ठाकूर हे दोन इंजिनियर हजर असल्याचे आढळून आले‌ मात्र एकही सुरक्षारक्षक उपस्थित नव्हता. त्याबाबत विचारणा केली असता ते सारे सहलीला गेल्याचे उत्तर मिळाले.

ह्या संशयास्पद वर्तनाने वन अधिकाऱ्यांनी गायब सुरक्षारक्षकांचा शोध घेतला असता, दीपक विलास खारोडे, सागर अशोक मानकर व वैभव प्रतीक बंड या तिघांना अकोला येथून अटक करण्यात आली. त्यांचेवर गुन्हे दाखल करून त्यांना तेल्हारा न्यायालयात हजर करण्यात आले. तेल्हारा न्यायालयाने या तिघांना २१ नोव्हेंबर पर्यंत वन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. दरम्यान या प्रकरणातील १३ आरोपी फरार असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली.

या साऱ्या प्रकाराबाबत सदर प्रकल्प धारक कंपनीने मात्र कानावर हात ठेवून त्याच्याशी आपला कोणताही संबंध नसल्याचे वन अधिकाऱ्यांना सांगितले आहे. प्रकल्प स्थळी हजर असणारेच या प्रकाराशी संबंधित असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. यावरून हे सारे प्रकरण आता सुरक्षारक्षकांवरच शेकणार असल्याचे दिसत आहे. एक दिवसाच्या वन कोठडीत आरोपीकडून माहिती घेण्यात येणार आहे. या माहितीतून काय बाहेर निघते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: