Thursday, April 25, 2024
Homeराजकीयआमदार भारसाकळेंनी दिली आकोट पालिकेला भेट…मारल्या उलट्या बोंबा…शहरात उठले चर्चेचे मोहोळ…

आमदार भारसाकळेंनी दिली आकोट पालिकेला भेट…मारल्या उलट्या बोंबा…शहरात उठले चर्चेचे मोहोळ…

Share

आकोट- संजय आठवले

आकोट पालिका कार्यकारीणी कालावधी संपल्याने बरखास्त झाल्यावर तब्बल एका आमदार प्रकाश भारसाकळे यांनी भेट देऊन पालिकेची पाहणी केली. या पाहणी दरम्यान त्यांनी बरखास्त नगरसेवकांना चांगलेच खडे बोल सुनावले. त्यामूळे शहरात या भेटीची खमंग चर्चा सुरू झाली असून आमदार व नगरसेवक हे भाजपच्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याने शहराच्या अधोगतीला नगरसेवकांइतकेच आमदारही कारणीभूत असल्याचे मत प्रकट होत आहे.

गत पंचवार्षिक निवडणुकीत भाजपाचे तब्बल १७ नगरसेवक निवडून आले होते. आमदार प्रकाश भारसाकळेही भाजपाचेच आहेत. नगराध्यक्षपदही भाजपच्याच वाट्याला गेले होते. सारांश, संपूर्ण मतदारसंघ आणि आकोट पालिकेत भाजपचीच सत्ता होती. आमदार भारसाकळे हे विकास पुरुष म्हणून तर नगराध्यक्ष हरिनारायण माकोडे हे साधा, भोळा, आम आदमी म्हणून निवडून आले. त्यामुळे विकासाबाबत अकोटकरांच्या अपेक्षा आकाशाला भिडल्या होत्या. परंतु पालिका आणि आमदार यांची कारकीर्द सुरू झाली आणि नागरिकांच्या अपेक्षांना उतरती कळा लागली. लोकप्रतिनिधी नामक ह्या पितळी भांड्यांची कल्हई उतरू लागली आणि नागरिकांची निराशा वाढू लागली. “सुधारने निकले बिगाड के बैठे” अशी नागरिकांची गत झाली.

अशातच पालिकेचा कालावधी संपला. नगराध्यक्ष, नगरसेवक यांना घरी जाऊन तब्बल वर्ष होत आहे. अशा स्थितीत आमदार भारसाकळे यांना पालिकेला भेट देण्याची लहर आली आणि त्यांनी या भेटीदरम्यान कहर केला. पालिकेची पाहणी करून त्यांनी विकास कामे न झाल्याबाबत नगरसेवकांना चांगलाच “घरचा अहेर” दिला. पालिकेत त्यांना रणगाडा उभा करण्याकरता केलेला चबुतरा दिसला. पालिका प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे हा चबूतरा रणगाड्याची प्रतीक्षा करीत उभा असल्याचे त्यांना कळले. आणि संतापून ते उद्गारले, “आता या रणगाड्याच्या चबूतऱ्यावर नगरसेवकांचे फोटो लावा”. त्यावर काही फिदीफिदी हसले. काही ओशाळवाणे हसले आणि काही इकडे तिकडे निरखू लागले. तर काहींनी स्तब्ध राहणेच पसंत केले.

भारसाकळेंच्या ह्या वाग्बाणांची चर्चा हां हां म्हणता शहरात पसरली. आणि नागरिकांच्या चर्चेचे मोहोळ उठले. परंतु ह्या चर्चेत ना आमदार उत्तीर्ण झाले ना नगरसेवक. याचे कारण म्हणजे शहराच्या अधोगतीला नगरसेवकांइतकेच आमदार भारसाकळेही कारणीभूत असल्याचे साऱ्यांचेच म्हणणे आहे. नगराध्यक्ष व नगरसेवकांनी विकासाची “ऐशी तैशी” केली याबाबत दुमतच नाही. परंतु आमदारांनीही स्वतःच्या कामांची गत “एक ना धड भाराभर चिंध्या” करून ठेवली आहे. कालंका चौक ते श्री शिवाजी महाविद्यालयाच्या मार्गाचे काम सहा महिन्यांपासून सुरू आहे. साऱ्या शाळा महाविद्यालये ह्याच रस्त्याने आहेत. सध्या काम बंद असून रस्त्यातील खड्डे आणि बांधकामासाठी टाकलेले साहित्य यामूळे त्या रस्त्याने चालणाऱ्यांना कांगारूच बनावे लागत आहे. सोनू चौक ते नंदीपेठेतून दर्यापूर मार्गाला जोडणारा मार्ग “हड्डीतोड सापळा” बनलेला आहे. रेल्वे पूल ते शासकीय विश्रामगृहापर्यंतचा मार्ग थिगळे लाऊनही फुटत तुटत चालला आहे. काम अद्यापही पूर्ण व्हायचेच आहे. शिवाजी चौक ते मच्छी बाजारातून अंजनगावकडे जाणारा मार्ग “खैबर खिंड” बनला आहे. हे दोन कामे भारसाकळेंचा चाहता कंत्राटदार संतोष चांडक याची आहेत. ही देण आहे आमदार भारसाकळेंची. विकास पुरुषाची कामे अशी तर त्या पुरुषाचेच अंग असलेले नगराध्यक्ष व नगरसेवक हे विकासाचा वेगळा प्रकाश कसा पाडणार?

त्यातच त्या बिचाऱ्यांना नडला भारसाकळेंचा अहंकार. कशाचेही श्रेय आपल्याखेरीज अन्य कुणाला मिळू नये, त्याचा सन्मान वाढू नये याकरिता भारसाकळे आवर्जून दक्ष असतात. त्यामुळे आपल्या निधीतील मोठमोठी कामे त्यांनी हेतूपुरस्सर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपवली. त्या कामांसाठी लागणारा लाखो रुपयांचा प्राथमिक खर्च मात्र पालिकेच्या ऊरावर टाकला. अशा स्थितीत रणगाड्याच्या चबुतऱ्याला नगरसेवकांचे फोटो लावण्याची भाषा भारसाखळेंनी केली. आकोटकरांनी मात्र त्यावरही ताण केली. त्यांच्या मते ह्या चबूतऱ्याला नगरसेवकांचे फोटो तर लावाच पण चबुतऱ्यावर आमदार भारसाखळे आणि नगराध्यक्ष माकोडे यांचे पुतळेही बसवा. म्हणजे आकोट शहराचा बोजवारा उडविणारे सारे चेहरे एकाच ठिकाणी एकाच वेळी पाहता येतील.

आमदार भारसाकळेंनी पालिके बाबत दाखविलेले हे पूतना मावशीचे प्रेम पाहून काही जाणकारांनी पालिकेचा आरसाच समोर ठेवला आहे. आकोट पालिकेत राज्यसंवर्गाची ३३ पदे मंजूर आहेत. त्यापैकी केवळ ९ जणच कार्यरत असून तब्बल २४ जागा रिक्त आहेत. त्यामध्ये अभियंता- ५, स्वच्छता विभाग- १, प्रशासन- ९, अग्निशमन- ३, नगरचना-३, स्वच्छता निरीक्षक- ३ या पदांचा समावेश आहे. नगरपरिषद संवर्गातील सर्वच्या सर्व म्हणजे १७ ही पदे रिक्त आहेत. याकरिता भारसाकळेंनी काहीच केलेले नाही. मुख्याधिकाऱ्यांचा विषय तर “तौबा तौबाच” आहे. दर चार सहा महिन्यात प्रभारी. कायमस्वरूपी येण्यास कुणीच तयार नाही. कुणी आलाच तर बकासुर बनूनच येतो. कुणी डोक्यावर पडलेला असतो. आता नवे मुख्याधिकारी आले आहेत. त्यांची गाडी अद्याप वळणावर यायची आहे. त्यामुळे आताच त्यांचा अंदाज बांधणे कठीण आहे. पण गडी नव्या दमाचा आहे. त्यामुळे काहीतरी चांगले होण्याची अपेक्षा आहे. ते आगामी काळ ठरवेलच. पण गतकाळात मुख्याधिकाऱ्यांची विस्कटलेली घडी नीट करण्याचा भारसाकळेंनी तीळमात्रही प्रयास केलेला नाही हे वास्तव आहे. त्यामुळे आपला चेहरा स्वच्छ नसताना भारसाकळेंनी नगरसेवकांना आरसा दाखविणे किती उचित आहे? याची चर्चा आकोटकर करीत आहेत.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: