वीज पडून हिवमठ, मुक्तापूर येथील तीन शेतकऱ्याचा जागीच मृत्यू…पिंपळगाव (राऊत )येथील बैलजोडीचा मृत्यू.
मेंढला (दि १८)
नरखेड तालुक्यात शनिवारी दुपारी ३ वाजता वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडून तीन शेतकऱ्यांचा व एका बैलजोडीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.
हिवरमठ ता नरखेड येथील योगेश रमेश पाठे वय २७ या तरुण शेतकऱ्याचा वीज पडून जागीच मृत्यू झाला . शनिवारी दुपारी १.३० च्या सुमारास शेतात पेरणी सुरु असताना अचानक विजेच्या गडगडाटासह पाऊस सुरू झाला. पाऊस सुरू झाल्यामुळे योगेश घरी जाण्यासाठी रस्त्यावर असलेल्या मोटार सायकल जवळ पोहचला असता अचानक वीज पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
मुक्तापुर शिवारात दुपारी २ वाजताच्या सुमारास पाऊस सुरू झाला पाऊसापासून बचाव करण्याकरिता शेतातील झोपडीत बसून असलेल्या झोपडीवरच वीज पडल्यामुळे दोघांचा जागीच मृत्यू झाला. त्यात दिनेश ज्ञानेश्वर कामडी वय वर्ष ३४, बाबाराव मुकाजी इंगळे वय वर्ष ६०दोघेही रा. मुक्तापुर याचा समावेश आहे विजेचा कडकडाट सुरू असताना अचानक एक वीज त्या झोपडीवर पडल्यामुळे दोघांचाही जागीच मृत्यू झाला. दिनेशचा घरी परतण्याचा वेळ झाला तरी तो शेतातून घरी का परत आले नाही म्हणून त्याचे वडील शेतात पाहायला गेले असता हे दोघेही शेतातील झोपडीत निपचित पडून होते. ते काही प्रतिसाद देत नसल्यामुळे त्यांनी सदरची माहिती गावातील नागरिकांना दिली असता दोघांचाही वीज पडल्यामुळे मृत्यू झाल्याची बाब लक्षात आली.
तालुक्यातील पिपंळगाव (राऊत )शिवारात भिष्णुर येथील शेतकरी सुनील तानबाजी कळंबे यांच्या शेतात दुपारी ३ वाजताच्या सुमारास विज पडुन बैलजोडी चा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
सदर घटनेची माहिती मिळताच सभापती नीलिमा सतीश रेवतकर सभापती यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी त्याच्या सोबत असलेले तलाठी तारकेश्वर घाटोळे यांना घटनेचा पंचनामा करून प्रकरण तहसीलदार यांच्याकडे सादर करण्याच्या सूचना केल्या. पशुसंवर्धन अधिकारी चव्हाण बीड जमादार जोशी बीड हेही उपस्थित होते.
वरील घडलेल्या तिन्ही ठिकाणच्या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच ठाणेदार मनोज चौधरी आपल्या सहकार्यान सोबत घटनास्थळी पोहचून मृत्यू देहाचा पंचनामा करून मृत देह उत्तरीय तपासणीसाठी शव विच्छेदन गृहात पाठविण्यात आला आहे.