सांगली – ज्योती मोरे
नुकतंच लग्न झालेल्या नवविवाहितेसह तिच्या प्रियकराने विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना जत तालुक्यातील एकुंडीत घडली आहे. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ माजली आहे.जत तालुक्यातील एकूण येथील लक्ष्मण संभाजी शिंदे वय 22 आणि नवविवाहिता अश्विनी जगन्नाथ माळी वय 21 अशी या प्रेमी युगुलांची नावे असून या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. परंतु गेल्या आठवड्यात 1 जून रोजी अश्विनीचे लग्न मिरज तालुक्यातील सलगरे गावच्या एका तरुणाशी झाले होते.
रविवारी अश्विनी ही आपल्या माहेरी आली होती.या लग्नामुळे दोन्ही प्रेमीयुगुलांमध्ये दुरावा निर्माण झाला होता. हा दुरावा असह्य झाल्यामुळे या दोघांनीही आपापल्या घरात सोमवारी सकाळी विष प्राशन केले.
त्यानंतर दोघांनाही त्रास सुरू झाल्यामूळे त्यांना जत येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचार सुरू करण्यापूर्वीच दोघांचाही मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. या घटनेमुळे जत सह पंचक्रोशीत खळबळ माजली असून हळहळ व्यक्त होत आहे.या घटनची नोंद जत पोलिसात करण्यात आली असून, अधिक तपास पोलीस करत आहेत