Homeराज्यकोविड काळात पत्रकार उत्कर्ष समितीने केलेले कार्य उल्लेखनीय – पालकमंत्री कु.आदिती तटकरे...

कोविड काळात पत्रकार उत्कर्ष समितीने केलेले कार्य उल्लेखनीय – पालकमंत्री कु.आदिती तटकरे…

अलिबाग – गेली दोन वर्ष संपूर्ण जग कोविडमुळे त्रस्त होते. मात्र या संकटकाळात देखील पत्रकार उत्कर्ष समितीच्या सर्वच पदाधिकारी व सदस्यांनी पत्रकारितेबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत जिल्ह्यात, राज्यात उल्लेखनीय कार्य केले, असे गौरवोद्गार माहिती व जनसंपर्कच्या राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आज पनवेल येथे काढले.

पत्रकार उत्कर्ष समिती, महाराष्ट्र राज्य अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समिती राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा आज पनवेल येथील वासुदेव बळवंत फडके सभागृहात संपन्न झाला, त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या.

यावेळी मान्यवर म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे निवृत्त सचिव व्ही.एस.म्हात्रे, मराठी इंडियन आयडॉल सागर म्हात्रे, अभिनेत्री अनघा कडू, महिला व बालकल्याण माजी सभापती उमाताई मुंढे, भावना घाणेकर, उद्योजक व समाजसेवक सुनील कोटीयन, सेंट विल्फ्रेड कॉलेजचे प्राचार्य डॉ. मृत्युंजयकुमार पांडे, समाजसेवक प्रकाशशेठ गायकवाड, धर्मेश दुबे, सतीश पाटील, डॉ. शिवदास कांबळे, पत्रकार उत्कर्ष समितीचे अध्यक्ष डॉ.अशोक म्हात्रे, डॉ. स्मिता पाटील हे उपस्थित होते.
पालकमंत्री कु.तटकरे म्हणाल्या की, कोविडसारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये पत्रकार बांधव आपल्यावर असलेली जबाबदारी पार पाडण्यात कुठेही कमी पडले नाहीत, याचा मला अभिमान आहे.

अलिबाग येथे जिल्हा माहिती भवन साकारण्यात येत असून त्या ठिकाणी अत्याधुनिक सुविधा असलेले विविध कक्ष उभारण्यात येणार आहेत. नुकतीच नवी मुंबई येथे सिडको मार्फत माहिती भवनासाठी इमारत उपलब्ध करून देण्यात आली आहे. या इमारतीचा उपयोग पत्रकारांना विविध उपक्रम राबविण्यासाठी करता येईल, असे सांगून त्या पुढे म्हणाल्या की, पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्याची तात्काळ दखल घेत त्याची तातडीने चौकशी करून आरोपींना शिक्षा होण्यासाठी कार्यवाही व्हावी,याकरिता राज्याचे गृहमंत्री श्री.दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे मागणी केली आहे.

पालकमंत्री कु.तटकरे यांनी याप्रसंगी पुरस्कारार्थींचे अभिनंदन करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.

या कार्यक्रमात दै.वादळवाराचे संपादक विजय कडू यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी आदर्श पत्रकार म्हणून दै. संध्याकाळच्या संपादिका रोहिणी खाडिलकर, दै.दबंग दुनियाचे संपादक उन्मेश गुजराती तर समाजरत्न विवेक मोकल, शशिकला गुंजाळ, वैद्यकरत्न डॉ. मनोज नागरगोजे, डॉ.सतिश मांढरे, पंचज्योती सन्मानात प्रेरणा गावकर (दुसरी सिंधूताई), सीमा पाटील (महिला शाहीर), शिल्पा आठल्ये (शास्त्रीय गायिका), प्रमिला पवार (शिक्षणातून समाजजागृती), सलोनी मोरे (खेळाडू) तसेच मराठी इंडियन आयडॉल म्हणून सागर म्हात्रे,महत्वाचा समजला जाणारा इलेक्ट्रॉनिक मीडियाचा पुरस्कार झी 24 तासचे रायगड जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल पवार, टि.व्ही.9 चे प्रतिनिधी लक्ष्मीकांत घोणसे पाटील यांना माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस कोविड तसेच इतर कारणांमुळे निधन झालेल्या पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांना दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन व श्रीगणेश पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. प्रस्तावना डॉ. स्मिता पाटील यांनी केली.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थितांसाठी आयोजित मनोरंजनात्मक कार्यक्रमास सुप्रिया वाळणकर डान्स ग्रुप व इतर कलाकारांनी रंगत आणली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री. पंडित यांनी केले व शेवटी आभारप्रदर्शनही केले. यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
यावेळी पत्रकार उत्कर्ष समितीचे उपाध्यक्ष राकेश खराडे, सचिव वैभव पाटील, सहसचिव अमोल सांगळे, खजिनदार शैलेश ठाकूर यांच्यासह इतर पदाधिकारी, पत्रकार व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments