Homeराज्यमहावितरणकडून जिल्ह्यातील वीज ग्राहकांना सुरक्षा ठेवीवरील व्याजाचा परतावा, ०६ लाख ९३ हजार...

महावितरणकडून जिल्ह्यातील वीज ग्राहकांना सुरक्षा ठेवीवरील व्याजाचा परतावा, ०६ लाख ९३ हजार वीजग्राहकांच्या वीजबिलात ५ कोटी ३८ लाख जमा…

अमरावती – महावितरणकडे सुरक्षा ठेव म्हणून जमा असलेल्या रकमेवरील व्याजापोटी  अमरावती जिल्ह्यातील उच्च व लघुदाब वर्गवारीतील ०६ लाख ९३ हजार ५९७ ग्राहकांना ५ कोटी ३८ लाख ८४ हजार रुपयांचा परतावा चालू आर्थीक वर्षाच्या विजबिलात देण्यात आला आहे.  सुरक्षा ठेवीवर महावितरणकडून दरवर्षी आरबीआय च्या सममुल्य दराने व्याज देण्यात येते.त्यामुळे सुरक्षा ठेवीचे बिल भरून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले  आहे. 

मा.महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाच्या विद्युत पुरवठा संहिता २०२१ च्या विनिमय १३.१ नुसार वीजग्राहकांना सुरक्षा ठेव आकारण्यात येते आणि मा.आयोगाच्या निर्देशानुसार सर्व वर्गवारीतील वीजग्राहकांनी महावितरणकडे सुरक्षा ठेव जमा करणे बंधनकारक आहे.

दरवर्षी सुरक्षा ठेवीची पुनर्गणना करण्यात येते व त्यानुसार आर्थिक वर्ष संपल्यानंतर ग्राहकांच्या मागील एका वर्षातील सरासरी वीजवापराच्या आधारे नवीन सुरक्षा ठेवीची रक्कम निश्चित करण्यात येते. याआधीची जमा असलेली सुरक्षा ठेव व वीजवापरानुसार नव्याने निर्धारीत करण्यात आलेली सुरक्षा ठेव यांच्यातील फरकाची रक्कम भरण्यासाठी वीज ग्राहकांना स्वतंत्र बिल देण्यात येते. यापूर्वी सुरक्षा ठेव सरासरी एका बिलाच्या रकमेइतकी होती.

आता वीजग्राहकांची सुरक्षा ठेव मासिक बिल असेल तर तेथे सरासरी मासिक बिलाच्या दुप्पट आणि त्रैमासिक असेल तेथे सरासरी त्रैमासिक बिलाच्या दीडपट घेण्याची तरतूद मा. आयोगाकडून करण्यात आली आहे.तसेच विनिमय १३.१ नुसार ग्राहकाने भरलेल्या सुरक्षा ठेव रकमेवर आरबीआयच्या दराच्या सममूल्य दराप्रमाणे  ४.२५ टक्के दराने व्याजाची रक्कम वीज ग्राहकांच्या वीजबिलात वळती करण्यात आली आहे. 

सन २०२१-२२ मध्ये अमरावती जिल्ह्यातील  उच्च व लघुदाब वर्गवारीतील ६ लाख ९३  हजार ५९७  ग्राहकांमध्ये अचलपुर विभागातील १ लाख ७६ हजार ४०२, अमरावती ग्रामिण विभागातील १ लाख ८५ हजार ३३७,मोर्शी विभागातील १ लाख ५० हजार १६९ तर अमरावती शहरातील १ लाख ८१ हजार ४५७ ग्राहकांचा समावेश आहे.याव्यतीरिक्त उच्चदाब वर्गवारीतील २३२ ग्राहकांच्या वीजबिलातही व्याजाची रक्कम समायोजित करण्यात आली आहे. 

वीज ग्राहकांना सुरक्षा ठेविवरील व्याजाची रक्कम समायोजित करतांना अतीरिक्त सुरक्षा ठेव भरण्यासाठी स्वतंत्र वीज बिल देण्यात आलेल्या आणि अतीरिक्त सुरक्षा ठेव न भरलेल्या ग्राहकांच्या सुरक्षा ठेविच्या रकमेतच सुरक्षा ठेविवरील  व्याजाची रक्कम समायोजित करण्यात आली आहे,तर अतीरिक्त सुरक्षा ठेव भरायची गरज नसलेल्या ग्राहकांच्या वीजबिलात व्याजाची रक्कम क्रेडीट करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments