Friday, April 19, 2024
Homeराजकीयमराठा समाजाचा खंदा आवाज निशब्द...शिवसंग्राम नेते विनायकराव मेटे अपघातात मृत्यूमुखी

मराठा समाजाचा खंदा आवाज निशब्द…शिवसंग्राम नेते विनायकराव मेटे अपघातात मृत्यूमुखी

Share

किरण बाथम /पनवेल

पनवेल नजीक मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर मराठा समाजाचा आश्वासक आवाज आज निशब्द झाला. शिवसंग्रामचे नेते विनायकराव मेटे यांच्या गाडीला पहाटे साडेपाच वाजता भीषण अपघात घडला. त्यांना पनवेलच्या एमजीएम हॉस्पिटल मध्ये आणण्यात आले. पण दुर्दैवाने त्यांची प्राणज्योत मालवली.

माडप बोगद्यामध्ये आज पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात झाला होता. अपघातानंतर जवळपास एक तासभर मेटे यांना कुठलीही मदत मिळाली नव्हती. यानंतर मेटे यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मेटे यांच्यासह त्यांच्या बॉडीगार्ड आणि गाडी चालकाची प्रकृती गंभीर होती. दरम्यान उपचारादरम्यान मेटे यांचं निधन झालं असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं जाहीर केली.

गाडीची अवस्था पाहूनच अपघात किती भयानक होता ते दिसते. मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर मुंबईच्या दिशेने मेटे येत होते. हायवेवरील पनवेल ते खालपूर दरम्यानच्या माडप बोगद्याजवळ हा अपघात घडला. पुढे जाणाऱ्या गाडीला मेटे यांच्या गाडीने जोरात धडक दिली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. गाडीच्या डाव्या बाजूचा भाग चक्काचूर झाला आहे. अपघातानंतर मेटे यांना एक तासभर कुणाचीही मदत झाली नाही. त्यानंतर त्यानंतर एमजीएम रुग्णालयात दाखल केलं होतं. मेटे यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते.

अपघातानंतर तब्बल एक तासभर कुणाचीही मदत नाही
मेटे यांचे सहकारी एकनाथ कदम हे देखील यावेळी त्यांच्यासोबत होते. त्यांनी सांगितलं की, बीडकडून आम्ही मुंबईकडे येत असताना हा अपघात झाला. आम्हाला एका ट्रकने कट मारला. मात्र आम्हाला अपघातानंतर एक तास मदत मिळाली नाही, असंही त्यांनी सांगितलं. 100 नंबरला आम्ही फोन केला,मात्र त्यांनी फोन उचलला नाही. मदतीसाठी मी प्रत्येकाला विनवणी करत होतो.मात्र कुणीही गाडी थांबवली नाही. मी रोडवर झोपलो होतो, आम्ही गाड्यांना हात करत होतो, मग एका गाडीवाल्यानं गाडी थांबवली आणि आम्हाला मदत केली. एका तासानंतर तिथं अॅम्ब्युलंस आली. अपघातानंतर मी मेटे यांच्याशी बोललो तर तेव्हा ते माझ्याशी संवाद करत होते, असंही एकनाथ कदम यांनी सांगितलं. एकनाथ कदम हे अपघातावेळी मेटे यांच्या सोबत होते. कदम यांना या अपघातात किरकोळ मार लागला आहे. मदतीसाठी एक तास कुणीही आलं नसल्याचं कदम यांनी सांगितलं. यंत्रणांनी देखील मदत केली नाही, असं ते म्हणाले.

कोण होते विनायक मेटे

विनायक मेटे हे शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख होते.मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनातील मेटे हे महाराष्ट्रातील प्रमुख नेते होते.मराठा आरक्षणासाठी मेटे यांनी अनेकदा आंदोलनं केली.अरबी समुद्रातील शिवस्मारक समितीचे ते अध्यक्ष देखील होते.बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील राजेगावचे रहिवासी होते.सर्वप्रथम शिवसेना भाजप युती सरकारच्या काळात आमदार त्यानंतर सलग पाच टर्म विधानपरिषद सदस्य होते.


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: