अमरावती जिल्ह्यातील डॉ. अनिल बोंडे यांची राज्यसभेवर वर्णी लागल्यानंतर पुन्हा जिल्ह्यात एका आमदाराची वाढ होणार आहे. राज्यातील 10 विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकीत भाजप (bjp) पाच जागा लढवणार आहे. उमा खापरे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे, श्रीकांत भारतीय (shrikant bhartiya) यांना भाजपने विधान परिषदेची संधी दिली आहे. श्रीकांत भारतीय हे नाव ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
विधान परिषदेच्या स्पर्धेतील अनेक ज्येष्ठ नेत्यांना डावलत भाजपने श्रीकांत भारतीय यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे. श्रीकांत भारतीय हे भाजपचे प्रदेश सरचिटणीस आहेत. भाजपचे अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना भारतीय हे फडणवीसांचे ओएसडी होते. भाजपचच्या किसान मोर्चाचे राष्ट्रीय कार्यकारिणीत सदस्य आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या वॉररुमचे प्रमुख होते. शिवसेनेवर सातत्याने टीका करणाऱ्या भाजपच्या नेत्यांपैकी ते एक आहेत.
तर प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना भाजपने दुसऱ्यांदा विधान परिषदेची संधी दिली आहे. तर राम शिंदे हे विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. त्यामुळे त्यांना विधान परिषदेवर पाठवण्यात येणार आहे. उमा खापरे (uma khapre) आणि श्रीकांत भारतीय या दोन नव्या चेहऱ्यांनाही भाजपने विधान परिषदेची संधी दिली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि चित्रा वाघ यांना विधान परिषदेसाठी संधी मिळेल अशी चर्चा होती. मात्र, या दोन्ही नेत्यांना भाजपने संधी नाकारली आहे. तर, मित्र पक्षाचे नेते विनायक मेटे आणि सदाभाऊ खोत यांचाही विधान परिषदेतील पत्ता कट करण्यात आला आहे.
