Friday, March 29, 2024
Homeराज्य"त्या" हिंस्त्र झालेल्या वन्यप्राण्याच्या तावडीतून वनकर्मचार्‍यांनी सोडविले, पण आता मानव प्राण्याच्या अन्यायातून...

“त्या” हिंस्त्र झालेल्या वन्यप्राण्याच्या तावडीतून वनकर्मचार्‍यांनी सोडविले, पण आता मानव प्राण्याच्या अन्यायातून कोण सोडविणार? हा प्रश्न पडलेल्या हिवरखेडकरांना मसीहाची प्रतीक्षा…

Share

आकोट – संजय आठवले

हिवरखेडात हैदोस घालीत अनेक ग्रामस्थांना जखमी करून दहशत पसरविणार्‍या एका हिंस्त्र माकडास पकडल्याने वन कर्मचाऱ्यांनी या माकडाच्या तावडीतून हिवरखेडकरांना सोडविले आहे. परंतु एका मानवी प्राण्याकडून सुरू असलेल्या अन्यायातून आपल्याला कोण सोडविणार असा प्रश्न हिवरखेड ग्रामस्थांना पडला आहे. महत्त्वाचे म्हणजे या मानवी प्राण्याला हा अन्याय करण्याजोगे बळ प्राप्त करून देण्यात हिवरखेड येथील नागरिकांचा मोलाचा वाटा राहिलेला आहे.

परंतु आता त्या मानवी प्राण्याकडून त्याच बळाचा उपयोग हिवरखेडवासियांच्या विरोधात होत असल्याने हिवरखेडात संतापाचे वातावरण पसरले आहे.गत काही दिवसांपासून हिवरखेड नगरीत हिंस्र झालेल्या एका माकडाने मोठा हैदोस घातला होता. त्याच्या वाटेत आडवा येणाऱ्यावर हे माकड जीवघेणा हल्ला करीत सुटले होते. त्याच्या तावडीत सापडलेल्या बेबीबाई विश्वास गवई, भारत झगडे, अभय मोहन वासेकर, अक्रम शहा असलम शहा यांचे सह सात जणांना या माकडाने गंभीर जखमी केलेले आहे.

त्याच्या या हिंसक हल्ल्याने संपूर्ण हिवरखेड दहशतीखाली आले होते. ही माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी चंदू तायडे, सोपान रेळे, विकास मोरे, दीपक मेहसरे, सुमंत रजाने या पथकाने या माकडास बंदुकीच्या साह्याने बेशुद्ध करून पकडले. त्यानंतर ह्या माकडाला पोपटखेडच्या वनात सोडून देण्यात आले. अशा प्रकारे एका हिंसक प्राण्याच्या तावडीतून वन कर्मचाऱ्यांनी हिवरखेडकरांची सुटका केली आहे.

परंतु गत काही दिवसांपासून हिवरखेडकरांवर एका मानव प्राण्याकडून सतत अन्याय करणे सुरू आहे. त्याच्या अन्यायातून सुटका होण्याचा मार्ग अद्याप हिवरखेडच्या ग्रामस्थांना सापडलेला नाही. मजेदार म्हणजे हिवरखेडकरांवर अन्याय करण्याचे बळ दस्तूरखुद्द हिवरखेडकरांनीच त्या मानव प्राण्याला पुरविलेले आहे. त्याकरिता या मानव प्राण्याने आपण विकास पुरुष असल्याचे सार्‍यांना भासविले, अनेकांना आपल्या सोयरपणाचा हवाला दिला, अनेकांशी स्नेहसंबंध प्रकट केले तर अनेकांच्या घरी त्यांचे दर्यापुरात असलेले सोयरे पाठवून आपण विकास पुरुष असल्याची त्यांना ग्वाही देवविली. असे ह्या मानव प्राण्याने संपूर्ण आकोट मतदार संघात केले.

ती खेळी यशस्वी होऊन हा मानव प्राणी आकोट मतदार संघाचा आमदार म्हणून निवडून आला. आमदार असल्याने जनमतास प्राधान्य देणे हे त्या मानव प्राण्याचे अर्थात प्रकाश भारसाकळे यांचे आद्य कर्तव्य ठरते. परंतु हिवरखेड बाबत ते नेमके हेच विसरले. अख्ख्या हिवरखेडकरांना आता ग्रामपंचायत ऐवजी नगरपंचायत हवी आहे. त्याकरिता लागणाऱ्या साऱ्या निकषांची पूर्तता झाल्याचे सरकारी अहवाल सांगत आहेत. तरी हिवरखेड नगरपंचायत होण्याच्या अंतिम टप्प्यात भारसाकळे यांनी त्यावर स्थगिती आणली आहे.

त्यामुळे आमदार भारसाकळे हे “विकास पुरुष” नव्हे तर “कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ” असल्याचे हिवरखेडकरांना दिसून आले आहे. त्याने अवघ्या हिवरखेड नगरीत त्यांचे बाबत मोठा रोष पसरलेला आहे. खाजगीत बोलताना हे प्रकाशभाऊ आपण फार मोठे आणि विकासाचा महामेरू असल्याचे भासवित असतात. दोनदा निवडून आल्याने आपल्या लोकप्रियते बाबत त्यांना मोठ्या अहंगंडाची बाधाही झालेली आहे.

मात्र या स्थगिती प्रकाराने लोकप्रियतेबाबतचा त्यांचा आत्मविश्वास ढासळलेला असून ते भयगंडाने व्याकुळ झाल्याचे दिसत आहेत. तसे नसते तर त्यांनी हिवरखेडला नगरपंचायतीचा दर्जा मिळू दिला असता. तसे झाल्याने त्यांच्या निकटस्थांचा मतदारसंघ खारिज झाल्यावर त्याच लोकांना नगरपंचायत मध्ये निवडून आणून नगरपंचायत त्यांची हवाली करता आली असती आणि आपल्या लोकप्रियतेचा ठसा अधिक जोरकसपणे उमटविता आला असता. परंतु ते तसे करीत नाही. म्हणजेच स्वतःच्या लोकप्रियतेबाबत ते साशंकित झाल्याचे स्पष्ट आहे.

वास्तविक हिवरखेड नगरपंचायत होऊ देण्यात काहीच गैर नाही. आता नगरपंचायत झाली म्हणून पुढे तिला नगरपालिका होण्यात काहीच बाधाही निर्माण होणार नाही. मात्र त्याकरिता आता बाधा आहे. आणि ती आहे लोकसंख्येची. वास्तविक हिवरखेडची लोकसंख्या आताच वर्ग तीनच्या नगरपालिकेचा निकष पूर्ण करणारी आहे. मात्र तिला सरकारी मान्यता नाही. ती जनगणनेनंतरच मिळणार आहे. आणि जनगणना इतक्यात होणार नाही.

परंतु ती होताच हिवरखेड नगरी नगर परिषदेकरिता पात्र ठरणार आहे. आणि ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. मात्र त्याकरिता थांबावे लागणार आहे. परंतु या थांबण्यात तीन फायदेही आहेत. पहिला फायदा म्हणजे लोकसंख्येबाबतची निकष पूर्तता होईल. दुसरा फायदा म्हणजे तितका काळ नगरपंचायत चालविण्याचे हिवरखेडकरांना प्रशिक्षण मिळेल. आणि तिसरा फायदा म्हणजे आमदार भारसाखळेंकरिता हिवरखेडचे जनमतही अनुकूल होईल.

सारांश हिवरखेड नगरपंचायत होण्यात तोटा काहीच नाही. फक्त इच्छाशक्तीची गरज आहे. परंतु दुर्दैवाने आमदार भारतसाखळे यांचेकडे इच्छाशक्तीचा मोठा दुष्काळ पडलेला आहे. त्यांचा स्वतःवरील विश्वास उडालेला आहे. हिवरखेड नगरपंचायत केल्यावर आपण तीवर झेंडा फडकवू शकलो नाही तर आपली नामुष्की होईल. त्याचा दुष्परिणाम आगामी निवडणुकीवर होईल. ह्या भयगंडाने त्यांना ग्रासलेले आहे. मात्र भविष्यात होणाऱ्या नुकसानाचे बीजारोपण आताच्या स्थगितीमुळे झाल्याचे त्यांच्या ध्यानातच आलेले नाही.

त्यामुळेच ते आपल्या समर्थकांकडून हिवरखेड नगरपरिषद करा, तालुका करा अशी मागणी करणारी निवेदने देवविण्याची नौटंकी करवून घेत आहेत. अशा नौटंकी ऐवजी त्यांना जीप पंसचे राजीनामे देण्यास सांगितले तर हिवरखेड करिता मोठा त्याग केल्याचा डंका पिटता येईल. राजकारणात त्याचा मोठा लाभही उचलता येईल. पण भारसाखळे आपल्या कार्यकर्त्यांना दुखवू इच्छित नाहीत. आंधळ्या धृतराष्ट्राला पुत्र प्रेमापुढे युधिष्ठिराची पात्रता आणि त्याला असलेले रयतेचे समर्थन दिसत नव्हते.

अगदी तीच गत भारसाखळे यांची झालेली आहे. त्यांनाही आपल्या चार दोन समर्थकांच्या फुटकळ फायद्यापुढे हिवरखेड जनतेचे जनमत दिसेनासे झाले आहे. परिणामी ज्यांच्या बळावर ते मोठे झाले त्याच लोकांवर नगरपंचायतच्या माध्यमातून ते सातत्याने अन्याय करीत आहेत. त्यामुळे या अन्यायकारी मानव प्राण्याचे हातून सोडविणाऱ्या मसीहाच्या प्रतीक्षेत हिवरखेडकर असल्याचे दिसत आहे.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: