सांगली – ज्योती मोरे
गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्ट आणि पृथ्वीराज पाटील फाउंडेशन च्या वतीने उभारण्यात आलेल्या देशातील पहिल्या अखंड शिव ज्योतीचा प्रज्वलन सोहळा जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील, युवा नेते वीरेंद्र पाटील, सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते दिमाखात पार पडला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील, माजी आमदार नितीन राजे शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांसह आणि समस्त शिवप्रेमी सांगलीकर उपस्थित होते.यावेळी शोभेच्या दारूची प्रचंड मनमोहक आतिशबाजी करण्यात आली. एकूणच हा संपूर्ण सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा ठरला.
संपूर्ण हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा 6 जून हा राज्याभिषेक दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून सांगलीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्या समोर ही अखंड शिवज्योत उभारण्यात आली आहे.
रायगडावरून आणलेल्या शिवज्योतीची मिरवणूक सांगलीतील टिळक चौकापासून कापड पेठ, दत्त मारुती चौक, गारमेंट चौक ,मारुती चौकातून काढून शेवटी शिवतीर्थावर ही ज्योत आणण्यात आली. आणि हजारो शिवभक्तांच्या साक्षीनं अखंडपणे तेवत राहणारी ही शिवज्योत प्रज्वलित करण्यात आली.