Tuesday, March 19, 2024
Homeराजकीय"२" या आकड्याने केला चमत्कार!…रोखली डाॅ. रणजीत पाटिल यांची हॅट्रिक…तब्बल साडेपाच हजार...

“२” या आकड्याने केला चमत्कार!…रोखली डाॅ. रणजीत पाटिल यांची हॅट्रिक…तब्बल साडेपाच हजार मते बाद…

Share

आकोट- संजय आठवले

अंकलीपीतील आकडे शुभ अशुभ असल्याची अनेकांची श्रद्धा आहे. तर हा सारा अंधश्रद्धेचा खेळ असल्याचा अनेकांना विश्वास आहे. मात्र मागील बारा वर्षात जे भल्याभल्यांना जमले नाही ते अंकलीपीतील “२” ह्या आकड्याने करून दाखविले आहे. अमरावती पदवीधर निवडणुकीच्या मतमोजणी मध्ये “२” ह्या आकड्याने डॉक्टर रणजीत पाटील यांच्या विजयाचा वारू रोखला असून त्यांना विजयाची हॅट्रिक करण्यापासून वंचित ठेवल्याचे आक्रित घडले आहे. या चमत्कारी “२” या आकड्याने तब्बल साडेपाच हजार मतपत्रिका बात केल्याने असे घडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे डॉ. पाटील यांचे करिता “२” हा आकडा अशुभ ठरल्याची चर्चा आहे.

अमरावती पदवीधर निवडणुकीत भाजप तर्फे डॉ. रणजीत पाटील व म. वि. आ. तर्फे धीरज लिंगाडे यांची नावे निश्चित झाल्यावर ही लढत रंगतदार होण्याची चिन्हे दिसू लागली होती. अनेक मातब्बरांनी ही लढत चुरशीची होणार असल्याचे भाकीत केले होते. चर्चांचे हे गुऱ्हाळ सुरू असतानाच १ लक्ष २ हजार ५८७ मतदारांनी मताधिकार बजावला. आणि त्यानंतर नियोजित वेळी मतमोजणी सुरू झाली. ह्या मतमोजणी मध्ये धीरज लिंगाडे यांना प्रथम पसंतीची ४३ हजार ३४० तर डॉ. पाटील यांना ४१ हजार २७ मते प्राप्त झालीत. तर तब्बल ८ हजार ७३५ मते बाद ठरलीत. डॉ. पाटील यांचेतर्फे या बादमतांची फेरमोजणी करण्याची मागणी करण्यात आली. त्याला निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मंजुरी दिली. त्यानुसार या बाद मतपत्रिकांची फेरमोजणी केल्यावर त्यात ३४८ मते वैध ठरलीत. या वैध मतांमध्ये धीरज लिंगाडे यांना १७७ तर डॉ.पाटील यांना १४५ मते प्राप्त झाली. अर्थात धीरज लिंगाडे यांना प्रथम पसंतीची एकूण ४३ हजार ५१७ तर डॉ.पाटील यांना ४१ हजार १७२ मते मिळाली. म्हणजे प्रथम पसंतीच्या मतांमध्ये लिंगाडे यांनी डॉ. पाटील यांच्यावर २ हजार ३४० मतांचे आधिक्य मिळविले.

परंतु ह्या बाद मतपत्रिकांच्या मोजणी मध्ये अजब प्रकार दिसून आला. तो म्हणजे अंकलीपीतील “२” ह्या आकड्याचा चमत्कार. तो असा की, मतमोजणी मध्ये प्रथम पसंतीची एकूण ८ हजार ७३५ मते बाद ठरली. त्यातील तब्बल ५ हजार ५०० मते डॉ. रणजीत पाटील यांची असल्याचे सूत्रांनी सांगितले. ते असे की, मतपत्रिकेत डॉ. पाटील यांचे नाव दुसऱ्या क्रमांकावर होते. आणि या बाद झालेल्या ५ हजार ५०० मतपत्रिकांमध्ये डॉ. पाटील यांचे नावासमोर “२” हा पसंतीक्रम लिहिलेला होता. दुसऱ्या कुणाच्याच नावासमोर “१” हा पसंतीक्रम लिहिलेला नव्हता. नियमाप्रमाणे कुठेतरी “१” हा पसंतीक्रमाचा अंक असल्याखेरीज “२” ह्या पसंतीक्रमाला अर्थच ऊरत नाही. त्यामुळे ती ग्राह्य धरल्या जात नाही. परिणामी अशी मतपत्रिका बाद करण्यात येते. आणि तेच झाले. या साऱ्या मतपत्रिका बाद करण्यात आल्या. ह्या साऱ्या मतपत्रिकांमध्ये केवळ डॉ. पाटील यांच्या नावासमोरच पसंतीक्रम लिहिलेला असल्याने ह्या बाद मतपत्रिका त्यांच्याच आहेत हे वेगळे सांगण्याची गरज नाही. म्हणजेच या “२” ऐवजी “१” हा अंक असता तर ही साडेपाच हजार मते डाॅ. पाटील यांचे नावे धरली गेली असती. त्यामुळे त्यांच्या प्रथम पसंतीच्या मतांमध्ये वाढ होऊन ती मते ४६ हजार ६७२ झाली असती. परिणामी धीरज लिंगाडे यांचेवर ३ हजार १५५ मतांचे आधिक्य डॉ. पाटील यांना मिळाले असते. आणि त्यांच्या विजयाची हॅट्रिक पूर्ण झाली असती.

परंतु “२” ह्या आकड्याने डॉ. पाटील यांचा घात केला. असे होण्यामागे एक मजेदार कारण असल्याचे सांगितले जाते. ते असे की, कुणीतरी बागेश्वर बाबा टाईप ईसमाने सांगितले की, मतपत्रिकेत डॉ. पाटील यांचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे त्यांचे नावासमोर “२” हा अंक लिहिल्यास त्यांना भरघोस मते मिळू शकतात. ही थाप कर्णोपकर्णी होऊ लागली. त्यात डॉ. पाटील भाजपचे उमेदवार. भाजप पक्का हिंदुत्ववादी पक्ष. देव, भूत, प्रेत, शुभ,अशुभ यावर या पक्षाची प्रचंड श्रद्धा. त्याने हां हां म्हणता हा भानामतीचा टोटका सर्वश्रुत झाला. परिणामी “२” हा अंक तब्बल साडेपाच हजार पदवीधर अंधश्रद्धाळूंनी डॉ. पाटील यांचे नावासमोर लिहिला. ह्या मिथकात किती तथ्य आहे, ते सांगणारे आणि ऐकणारे यांनाच ठाऊक. परंतु ह्या साडेपाच हजार मतपत्रिकांवर डॉ. पाटील यांचे नावासमोर “२” हा अंक लिहिला हे वास्तव असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

ही माहिती खरी असल्यास “२” हा अंक डॉ. रणजित पाटील यांच्या चांगलाच कच्छपी लागला असल्याचे दिसते. मतपत्रिकेत त्यांचे नाव क्रमांक “२”वर असणे, साडेपाच हजार मतदारांनी त्यांचे नावासमोर “२” हा पसंतीक्रम लिहिणे, मतमोजणीचा महिना “२” (फेब्रूवारी) असणे, मतमोजणीची तारीखही “२” असणे आणि अकोल्या जिल्ह्यात त्यांच्याच पक्षात त्यांना “२” तगडे प्रतिस्पर्धी असणे. हे विलक्षण योगायोग पाहून धर्मांध लोक “२” हा अंक डॉ. पाटील यांचेकरिता अशुभ असल्याची भविष्यवाणी करतील. तर विज्ञानवादी लोक साडेपाच हजार मूर्ख मतदारांना नीटपणे मतदान करता आले नाही असा निष्कर्ष काढतील.

जाता जाता— या निवडणुकीत एकूण २६५ टपाल मतपत्रिका प्राप्त झाल्या. मतमोजणीची सुरुवात टपाल मतपत्रिकांच्या मोजणीने झाली. या मोजणीत एकूण ७३ मतपत्रिका रद्द करण्यात आल्या. विविध कारणांनी ह्या मतपत्रिका रद्द झाल्या. काही मतपत्रिकांसोबत नियमानुसार नमुना १३ए मध्ये मतदाराने करावयाची घोषणाच केलेली नव्हती. काही घोषणांवर मतदारांची स्वाक्षरी नव्हती. काही घोषणा राजपत्रित अधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेल्या नव्हत्या. काही टपाल मतपत्रिकांसोबतचा नमुना १३बी सीलबंद लिफाफ्यात नव्हता. अशा विविध कारणांनी ह्या मतपत्रिका रद्द करण्यात आल्या. महत्त्वाचे म्हणजे या ७३ मतपत्रिकांमध्ये सर्वाधिक म्हणजेच ३४ मतपत्रिका अकोला जिल्ह्यातील होत्या. प्रशासकीय सेवेतील लोक असे टपाल मतदान करीत असतात. प्रशासकीय सेवेत असणाऱ्यांना मतदानाची प्रक्रिया ठाऊक असणे अनिवार्य आहे. परंतु या ७३ रद्द मतपत्रिकांनी प्रशासकीय सेवेत किती मूर्खता भरलेली आहे याची साक्ष दिली आहे.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: