Homeराज्यनंदी पेठ रस्ता बांधकाम प्रकरणी उपविभागीय अधिकारी यांनी काढला तोडगा, मोर्चेकरी तोडगेवार...

नंदी पेठ रस्ता बांधकाम प्रकरणी उपविभागीय अधिकारी यांनी काढला तोडगा, मोर्चेकरी तोडगेवार समाधानी…

आकोट – संजय आठवले

आकोट शहरातील सोनू चौक ते नंदी पेठ परिसरातून थेट दर्यापूर मार्गाला जोडणाऱ्या रस्ता बांधकामा संदर्भात काढण्यात आलेल्या मोर्चा नंतर आकोट उपविभागीय अधिकारी यांनी या कामा संबंधित अधिकारी व मोर्चेकरी यांची संयुक्त बैठक घेऊन त्या समस्येवर यशस्वी तोडगा काढला आहे. या तोडग्याने मोर्चेकऱ्यांचे समाधान झाले असून गणेश विसर्जनानंतर याबाबत प्रत्यक्ष कारवाईस सुरुवात केली जाणार आहे.

वाचकास स्मरतच असेल की, सोनू चौक ते नंदीपेठ येथून दर्यापूर मार्गाला जोडणाऱ्या रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम अर्धवट स्थितीत असल्याने नंदीपेठ वासियांना अतिशय त्रासाचा सामना करावा लागत आहे. अशातच या रस्त्याने जाणाऱ्या एका आठ वर्षीय बालकाचे पायास जबर इजा झाली. त्यामुळे चवताळलेल्या नंदीपेठ वासियांनी आकोट नगर परिषदेवर मोर्चा नेला. त्या मोर्चाची दाखल घेऊन आकोट उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सोमवार दिनांक ५ सप्टेंबर रोजी या कामाशी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावली.

या अधिकाऱ्यांसह मोर्चेकऱ्यांशीही त्यांनी संवाद साधला. मोर्चेकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांनी त्या दूर करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. सद्यस्थितीत गणेशोत्सव सुरू आहे त्यामुळे या कामा संदर्भात गणेश विसर्जनानंतर प्रत्यक्ष सुरुवात करण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांचे संयुक्त पथक गठीत करण्यात आले आहे. दिनांक १२ सप्टेंबर पासून या पथकाने या रस्ता बांधकामास अडचण ठरणाऱ्या अतिक्रमित बांधकामांची दखल घेऊन तथा भूमी अभिलेख विभागाकडे असलेल्या नोंदी लक्षात घेऊन त्याची यादी तयार करायची आहे.

यादी झाल्यानंतर त्यानुसार अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू केली जाणार आहे. हे अतिक्रमण निघताच रस्ता बांधकामास सुरुवात केली जाईल. बैठकीत ठरलेल्या या प्रक्रियेस मोर्चेकऱ्यानीही सहर्ष सहमती दर्शविली. नंदी पेठ वासियांचा मोर्चा निघाल्यापासून हा तोडगा निघेपर्यंत आकोट पोलीस विभागानेही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

आकोट नगर परिषदेमध्ये मोर्चा गेल्यानंतर ठाणेदार प्रकाश अहिरे यांनी घटनास्थळी पाठविलेल्या पोउनि राजेश जवरे, पोउनि रणजीत खेळकर,पोउनि अख्तर शेख तथा पथकाने मोर्चेकऱ्यांना शांत केले होते.

त्यामुळे काही अनुचित प्रकार घडला नाही. त्यानंतर ठाणेदार प्रकाश अहिरे यांच्या निर्देशानुसार पोउनि रणजीत खेळकर यांनी या कामा संबंधित असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभाग, विद्युत विभाग, भूमि अभिलेख यांच्याशी संपर्क करून त्यांना प्रकरणाचे गांभीर्य सांगितले. त्यामुळे उपविभागीय अधिकारी यांनी बोलावलेल्या या बैठकीत यशस्वी तोडगा निघण्यास मोठी मदत झाली. त्याकरिता नंदीपेठवासियांनी पोलीस विभागाचे आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments