Wednesday, April 24, 2024
Homeनोकरीराज्यात पोलीस शिपाई संवर्गातील १४,९५६ जागा भरण्याचा मार्ग मोकळा…विदर्भातून १,१७५ तर अकोला...

राज्यात पोलीस शिपाई संवर्गातील १४,९५६ जागा भरण्याचा मार्ग मोकळा…विदर्भातून १,१७५ तर अकोला जिल्ह्यातून ३२७ जागा भरल्या जाणार…

Share

आकोट- संजय आठवले

राज्यात बहुप्रतिक्षित असलेला पोलीस शिपाई भरती चा मार्ग आता मोकळा झाला असून त्या अंतर्गत राज्यातील पोलीस शिपाई पदांच्या १४ हजार ९५६ जागा भरल्या जाणार आहेत. त्यामध्ये विदर्भातून १,७७५ तर अकोला जिल्ह्यातून ३२७ जागांचा समावेश आहे. यासंदर्भात संबंधितांकडून १ नोव्हेंबर २०२२ रोजी जाहिरात प्रकाशित केली जाणार आहे. तर इच्छुक उमेदवारांकडून ३ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत आवेदन पत्रे स्वीकारली जाणार आहेत.

सन २०२१ मध्ये राज्याच्या विविध जिल्ह्यातून दिनांक ३१. १२. २०२१ पर्यंत रिक्त होणाऱ्या पोलीस शिपाई पदांचे अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात आले होते. हे अहवाल संकलित स्वरूपात राज्याचे पोलीस महासंचालक यांना सादर करण्यात आले. त्यावर राज्याचे पोलीस महासंचालक तथा प्रशिक्षण व खास पथक महाराष्ट्र राज्य मुंबई संजय कुमार यांनी दिनांक २७ ऑक्टोबर २०२२ रोजी आदेश जारी करून या अहवालानुसार राज्यातील पोलीस भरतीला हिरवी झेंडी दिली आहे. त्यानुसार अकोला जिल्ह्यातून ३२७, विदर्भातून १,७७५ तर राज्यातून १४,९५६ पोलीस शिपाई पदे भरली जाणार आहेत. तशा आशयाचे आदेश राज्याचे पोलीस महासंचालक संजय कुमार यांनी राज्यातील सर्व विभागीय पोलीस आयुक्त तथा जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक यांना पाठविले आहेत. या आदेशानुसार त्या त्या जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना दिनांक १ नोव्हेंबर २०२२ रोजी वर्तमानपत्रात जाहिरात देऊन ही माहिती सार्वजनिक करावी लागणार आहे.

या पदांसाठी इच्छुक उमेदवारांना संगणकीय प्रणालीद्वारे दिनांक ३ नोव्हेंबर 22 ते ३० नोव्हेंबर २२ पर्यंत आवेदन पत्रे भरावी लागणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांना एका वेळी एकाच जिल्ह्यात अर्ज दाखल करता येणार आहे. अर्थात एकावेळी दोन अथवा त्यापेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये अर्ज करता येणार नाही. तसेच मागासवर्गीय उमेदवार खुल्या प्रवर्गात अर्ज दाखल करू शकतात. मात्र खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना मागास प्रवर्गात अर्ज दाखल करता येणार नाही. या भरती प्रक्रियेमधील अटी व शर्तीही पोलीस महासंचालकांनी जारी केल्या आहेत.

महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम, २०११ व त्यामध्ये शासनाने वेळोवेळी केलेल्या आणि दिनांक २३.६.२०२२ च्या सेवाप्रवेश नियमात केलेल्या सुधारीत तरतुदीनुसार पोलीस आयुक्त / पोलीस अधीक्षक यांचे आस्थापनेवरील पोलीस शिपाई यांची रिक्त असलेली पदे भरण्यासाठी आवेदनपत्र संगणकीय प्रणालीद्वारे दिनांक ०३.११.२०२२ ते ३०.११.२०२२ या कालावधीत स्विकारण्यात येतील. ह्या बाबतची सविस्तर माहिती policerecruitment 2022.mahait.org आणि www.mahapolice.gov.in या संकेतस्थळांवर उमेदवारांच्या माहितीकरिता प्रसिद्ध करण्यात आली आहे.

उमेदवारास पोलीस आयुक्त / पोलीस अधीक्षक यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई या पदासाठी ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करता येईल. ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज सादर करण्याची सुविधा policerecruitment2022.mahait.org या संकेतस्थळावर उपलब्ध राहणार आहे.

उमेदवार एकाच घटकात एका पदासाठी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर करु शकत नाही.

उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास, उमेदवारी कोणत्याही टप्यावर रद्द होईल..

पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराची प्रथम ५० गुणांची शारीरीक चाचणी परीक्षा घेण्यांत येईल व त्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांच्या आस्थापनेवरील भरती प्रक्रिया वगळता इतर सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यांत येईल. त्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज भरावा.

भरती प्रक्रियेमध्ये प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. शारिरीक योग्यता चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवारांमधून संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदाच्या १.१० प्रमाणात उमेदवारांची १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान ४० टक्के गुण मिळविणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये ४० टक्केपेक्षा कमी असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील. गुण

शारिरीक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये नमूद केलेल्या दोन निकषांच्या निकालाच्या आधारे उमेदवारांमधुन एक गुणवत्ता यादी तयार केली जाईल. तात्पुरत्या निवडसूचीमध्ये समावेश झालेल्या उमेदवारांचीच मूळ कागदपत्रे पडताळणी करण्यात येतील. कागदपत्र पडताळणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निवडसूचीमध्ये समावेश केला जाईल, निवडसूचीतील उमेदवाराची निवड तात्पुरती (Provisional selection) असेल. निवडसूचीमध्ये उमेदवाराच्या नावाचा समावेश झाला म्हणून नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे समजण्यात येवू नये. शारिरीक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये मिळालेल्या गुणांचे एकत्रिकरण केल्यानंतर, गृहविभाग शासन निर्णय, दि.१०.१२.२०२० नुसार अंतिम गुणवत्तायादी तयार करण्यांत येईल.

पदोन्नतीवरील आरक्षणासंदर्भात शासनाने मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक २८३०६/२०१७ बाबत होणान्या अंतिम निर्णयाच्या आदेशाच्या अधिन राहून व मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी जनहित याचिका क्रमांक १७५/२०१८ व इतर संलग्न याचिकांमध्ये दिनांक २७.०६ २०१९ रोजी दिलेल्या निर्णयाविरुध्द मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेबाबत होणाऱ्या अंतिम निर्णयाच्या अधिन राहून रिक्त पदांची गणना केलेली आहे. त्यामुळे जाहीरातीमध्ये नमूद केलेल्या रिक्त पदांच्या संख्येमध्ये बदल होऊ शकतो व त्याची माहिती वेळोवेळी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानुसार नियुक्ती अधिकारी यांना पदे भरण्याचा अधिकार आहे.

शासनाने लागू केलेले खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी लागू केलेले आरक्षण हे या अनुषंगाने उद्भवणान्या न्यायालयीन प्रकरणातील अंतिम निर्णयाच्या अधिन असेल.

पोलीस शिपाई पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता, शारिरीक पात्रता, आवश्यक असलेली प्रमाणपत्रे / कागदपत्रे, सामाजिक व समांतर आरक्षणाबाबची माहिती परीक्षा शुल्क आवेदन अर्ज सादर करण्याबाबतची माहिती अर्ज सादर करण्याचा दिनांक व वेळ आणि उमेदवारांसाठी सविस्तर सूचना policerecruitment2022.mahait.org या संकेतस्थळावर दिलेल्या सविस्तर जाहिरातीमध्ये उपलब्ध आहेत. सदरहू जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून, समजून घ्यावी. तसेच, सामाजिक, समांतर आरक्षण व अनाथांकरीता उपलब्ध पदांच्या १% आरक्षित जागा विचारात घेऊन रिक्त पदांबाबतची खातरजमा करावी व त्यानंतरच उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज सादर करावेत.

उमेदवारांनी संकेतस्थळावर जावुन आवेदन अर्ज सादर करावयाचा आहे, त्या घटकात रिक्त असलेली पदे विचारात घेऊनच उमेदवाराने अर्ज सादर करावेत, मागासवर्गीय उमेदवार खुल्या प्रवर्गात ( Unreserved) अर्ज करु शकतात, परंतू खुल्या प्रवर्गातील (Unreserved) उमेदवार मागासवर्गीय प्रवर्गात अर्ज करू शकणार नाहीत.


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: