सांगली – ज्योती मोरे
रत्नागिरी ते नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा सापळाच बनत चालला आहे याची प्रचिती आज पुन्हा आली. या महामार्गावरील अपघाताची मालिका दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आज कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज गावानजिक रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रकला कारने पाठीमागून जोरदार धडक देवून झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
हा अपघात दुपारीच्या दरम्यान घडला असून अपघातातील मृत व जखमी हे सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील कळसकरवाडी येथील आहेत.जिल्ह्यातील माण तालुक्यातील कळसकरवाडी येथील आहेत.
या अपघातात आनंदराव शिवराम पवार (वय 68)व माणिक साहेबराव पवार (वय54) हे दोघे जागीच ठार झाले तर उषाताई आनंदराव पवार (वय62)व स्वप्निल आनंदराव पवार (वय 28) हे अपघातात जखमी झाले आहेत. नागज गावच्या पश्चिमेकडील बाजूला गावापासून थोड्या अंतरावर पेट्रोल पंपाच्या शेजारी कांदा घेवून मिरजेकडे जाणारा एम.एच.23/ 7270 हा ट्रक रस्त्याच्या कडेला थांबला होता.
कळसकरवाडी येथील पवार कुटूंबीय तुळजापूर,पंढरपूर येथे देवदर्शन करून कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र जोतीबा येथे स्व मालकीच्या होंडाई व्हेनू बनावटीची कार क्र.एम.एच.11/डी.ए. -7658 मधून निघाले होते. दुपारीच्या सुमारास भरधाव वेगात असलेल्या कारने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की यामध्ये चार चाकीचा पुरता चक्काचूर झाला.
अपघातातील दोघा जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर गोडे व त्यांच्या पथकाने घटनास्थळाला भेट दिली. हुंडाई कंपनीची नवीन कार घेऊन देवदर्शनासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.