संजय आठवले – आकोट
राज्य परिवहन कर्मचा-यांच्या संपादरम्यान त्यांची फसवणूक करुन निधी गोळा केल्याच्या आरोपावरुन विधिज्ञ गुणरत्न सदावर्ते आकोटात पोलीस चौकशीकरिता सपत्निक आले होते. तब्बल तिन तास झालेल्या चौकशीनंतर त्यानी पत्रकारांच्या प्रश्नाना ऊत्तरे देताना यापुढे आपला कष्टकरी जनसंघ हा पक्ष विदर्भ आणि मुंबई याना स्वतंत्र राज्य बनविण्यासाठी लढणार असल्याचे सांगितले.
राज्य कर्मचा-यांच्या फसवणूकी संदर्भात आकोट न्यायालयाने विधिज्ञ गुणरत्न सदावर्ते याना चौकशी अधिकारी म्हणतील तेंव्हा चौकशीस ऊपस्थित राहण्याच्या अटीवर अटकपूर्व जामीन दिला होता. त्यानुसार आकोट ठाणेदार व चौकशी अधिकारी प्रकाश अहिरे ह्यांनी सदावर्ते दांपत्याला चौकशीकरिता बोलाविले होते. त्या अनुषंगाने हे दांपत्य १६ जून रोजी दूपारी चार वाजताचे दरम्यान आकोटात दाखल झाले. त्यानंतर या दांपत्याची तब्बल तिन तास बंदद्वार चौकशी करण्यात आली.
यावेळी छायाचित्रे घेणे, हाताच्या पंज्याचे ठसे घेणे आदी कायदेशिर बाबींची पुर्तता करण्यात आली. त्यानंतर आकोट न्यायालयात मान्य केल्यानुसार सदावर्ते यानी आकोट रा.प.म. कर्मचा-यांकडून घेतलेले ७४,४०० रुपये पोलीसांकडे सोपविले. त्यानंतर प्रश्नोत्तरे होऊन तीन तासानंतर सदावर्ते दांपत्य बाहेर पडले.
आणि त्यानी पत्रकारांशी संवाद साधला. आपण कष्टकरी जनसंघ हा पक्ष स्थापन केला असुन ह्या पक्षाचे माध्यमातुन आपण विदर्भ आणि मुंबई ही दोन स्वतंत्र राज्ये व्हावित म्हणून लढा लढणार असल्याचे त्यानी सांगितले. त्यानंतर विचारण्यात आलेल्या अनेक प्रश्नाना त्यानी त्यांच्या शैलीत असंबद्ध ऊत्तरे दिली.
क्षणचित्रे
सदावर्ते ज्या गाडीने आकोटात आले तशी आलिशान गाडी प्रथमच पाहण्यात आल्याने अनेकानी त्या गाडीपाशी सेल्फी घेतले. ही गाडी कुतुहलाचा विषय होती.
सदावर्तेंसोबत आलेली माणसे पोलीस ठाण्यातुन निघून जाईपर्यंत आपल्या भोवती एक गुढ वलय ठेवून वावरत होती.
त्यानी कुणाशीही बोलणेच नाही तर कुणाकडे पाहणेही टाळले. आम्हाला कुणाशीही न बोलण्याच्या सुचना आहेत एवढेच ते बोलले.
आपल्या रहस्यमयी वागण्याने हे लोक एखाद्या अंडरवर्ल्ड टोळीचे आहेत कि काय? असा प्रश्न चर्चिल्या जात होता.
कष्टकरी लोकांचा नेता करोडो रुपयांची गाडी व सोबत अन्य गाड्यांचा ताफा घेवून कसा फिरु शकतो? असा प्रश्नही ऊपस्थितांमध्ये विचारला जात होता.
सदावर्तेंचे नारे लावणारे अति ऊत्साही एस टी कर्मचारी, सदावर्तेनी संप वाढवून तुम्हासाठी काय मिळविले? या प्रश्नाचे ऊत्तर देवू शकले नाहीत.