गणेश तळेकर
मनोरंजन विश्वात करियर करणाऱ्यांसाठी प्रत्येक विभागातील कामाचं ज्ञान असणं गरजेचं असतं. अभिनयासोबतच तांत्रिक विभागाचीही माहिती असणारे कलाकार मनोरंजन विश्वात गरुडझेप घेण्यात यशस्वी ठरतात असं आजवर पहायला मिळालं आहे.
यासाठी कलाकार बनू इच्छिणाऱ्यांमधील कलागुणांना योग्य मार्गदर्शन देणं गरजेचं असतं.सर्वसामान्यांमधील याच कलागुणांना वाव देत त्यांना आकार देण्याचं काम करण्याच्या उद्देशानं कार्यरत असणाऱ्या वाघोबा प्रॉडक्शनने एका महत्त्वपूर्ण ११ दिवसाचे निवासी अभिनय कार्यशाळेचं आयोजन केलं आहे.
या निवासी कार्यशाळेमध्ये प्रमुख प्रशिक्षक म्हणून सुप्रसिद्ध निर्माते- अभिनेते -दिग्दर्शक प्रणव जोशी यांचे मार्गदर्शन लाभणार आहे तसेच तेजपाल वाघ, विशाल शिंदे, नयन जयप्रकाश, शैला टिके -कुलकर्णी, डॉ. प्रेरणा बेरी – काळेकर आणि प्रसाद नामजोशी आदी मान्यवरांचं मार्गदर्शन लाभणार आहे.
करियर घडवण्यासाठी आज मनोरंजन विश्वात बरीच माध्यमं उपलब्ध आहेत. यापैकी रंगमंच, मालिका, चित्रपटांसोबतच आजच्या युगातील लोकप्रिय माध्यम असणाऱ्या वेब सिरीजमध्ये अभिनय तसेच इतर तांत्रिक विभागात करियर करू इच्छिणाऱ्यांसाठी ही कार्यशाळा मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही.
सदर कार्यशाळेत विद्यार्थींची संख्या ही मर्यादित असून १४ जून ते २४ जून या कालावधीत वाघोबा स्टुडीयो, वाई येथे होणार आहे. कार्यशाळेच्या शेवटी चित्रपट क्षेत्राच्या अनुभवासाठी शॉर्ट फिल्म व नाट्य अनुभवासाठी एकांकिका निर्मिती केली जाईल.