रामटेक – राजू कापसे
रामटेक तालुक्यातील महाराष्ट्राच्या सर्वात शेवटच्या टोकावर असलेल्या सितापार ( लोधा ) या गावापासून पूर्वेला १ किलोमीटरवर बावनथडी नदीच्या कडेला असणाऱ्या दोन पर्वतांपैकी एका पर्वतावर २००४-०५ साली शितलादेवी देवस्थानची स्थापना करण्यात आली.
सितापार येथील नागरिकांच्या श्रद्धेनुसार तिथे स्वयंभूपणे शितलादेवी अवतरीत झाल्या.तेव्हापासून सुरुवातीच्या काळात या देवस्थानात शेकडो-हजारो श्रद्धाळू दर्शनासाठी आले.अनेकांनी देवस्थानात सोण्या-चांदीचे दागिने अर्पण केले होते.भाविक भक्तांद्वारे आतापर्यंत लाखो रुपयांची देणगी त्या देवस्थानात चढविण्यात आली आहे.
मात्र तेथील सोन्या-चांदीचे दागिने आणि चढविण्यात आलेली रोख लाखो रुपयांची देणगी कुठे गायब झाले हे कुणालाच माहीत नाही.सितापार येथील दोन-तीन व्यक्तींकडे ते पैसे देण्यात आले होते.मात्र त्यानंतर त्यांनी ते परत केले नसून स्वतः ठेवले असल्याची चर्चा गावात अधा-मधात होत असते.
बावनथडी नदीच्या कडेला असलेले हे देवस्थान वास्तविकपणे मध्यप्रदेशच्या हद्दीत येत असते.सितापार पासून १ किलोमीटर अंतरानंतर मध्यप्रदेशची सीमा शुरू होते.देवस्थानापासून गाव जवळ असल्यामुळे येथील सर्व आयोजन,नियोजन सितापार येथील गावकरीच करीत असतात.
बावनथडी नदीच्या दुसऱ्या टोकावर असलेल्या पर्वताच्या पलीकडे शिवनी जिल्ह्यातील मध्यप्रदेशची गावे आहेत.राजीव सागर धरणाच्या थांबलेल्या पाण्यामुळे आता तेथील गावकऱ्यांना या देवस्थानात सहजपणे येता येत नाही.शिवाय देवस्थान मध्यप्रदेशमध्ये असले तरी संबंध मात्र महाराष्ट्राच्या गावांशीच जास्त येत असल्याने नवरात्र उत्सव आणि अन्य आयोजन सितापार येथील गावकरीच करीत असतात.पूर्वी शिवनी जिल्ह्यातील पिंडरई या गावातील झिट्या म्हणून एक म्हातारे पुजारी तिथे रोज यायचे.
दिवसभर मंदिरावरच राहून ते संध्याकाळी घरी परत जायचे.मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे आता त्यांचे इथे येणे बंद झाले आहे.काही श्रद्धाळूनी देवीने त्यांची इच्छा पूर्ण केल्यामुळे मंदिरात चढण्यासाठी पायऱ्या तयार केल्या आहेत.गावातील नागरिक बन्सीलाल फुलबेल यांच्या अर्थसाहाय्याने आणि गावातील युवकांनी श्रम केल्यामुळे तिथे देवीचे मंदिर निर्माण करण्यात आले आहे.
परिसरात या देवस्थानाबद्दल भाविक भक्तांच्या मनात प्रगाढ श्रद्धा आहे. शिवाय दुरूनही भक्तजन इथे दर्शनासाठी येत असतात.दरवर्षी येथे अश्विन नवरात्र उत्सव साजरा केला जातो.त्यासाठी गावोगावी फिरून वर्गणी गोळा केली जाते.अन्नधान्य एकत्रित केल्या जाते.देवस्थानची स्थापना झाल्यापासून आतापर्यंत हजारो-लाखो भक्तजन येथे दर्शन करून गेले.मनमुराद इच्छा पूर्ण केल्याने अनेकांनी इथे रोख देणग्या दिल्या.त्या ठिकाणी एक दानपेटी ठेवण्यात आली आहे.
मात्र अनेकदा त्या दानपेटीला तोडून चोरी झाल्याचे प्रकार तिथे घडले आहेत.इतक्या वर्षाचा सर्वांगीण हिशोब कोणीच सांगायला तयार नाही.सितापार येथील अनेक व्यक्तींनी तेथील पैसे आपल्याकडे ठेवले असून आता ते परत द्यायला तयार नसल्याची चर्चा गाव आणि आजूबाजूच्या परिसरातही होत असते.त्यामुळे मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राच्या संबंधित शासन- प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करून भक्तजनांनी श्रद्धेने चढविलेले ते पैसे आणि दागिने कुठे आहेत ? हे शोधणे आवश्यक आहे.