Homeगुन्हेगारीशेजाऱ्यावर कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याप्रकरणी आकोट जिल्हा व सत्र न्यायालयाने तिघांना...

शेजाऱ्यावर कुऱ्हाडीने वार करून हत्या केल्याप्रकरणी आकोट जिल्हा व सत्र न्यायालयाने तिघांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा…

संजय आठवले, आकोट

आकोट येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश चकोर बाविस्कर यांनी दहिहांडा पो.स्टे. चे फाईल वरून गुन्हा क्र. १३१/२०१९ भादंवि कलम ३०२,४५२, ३२३, (३४) मधील आरोपी क्र. ०१. सागर उर्फ मुकेश विठ्ठल बारब्दे वय २९ वर्ष, आरोपी क्र. ०२. सौ. ज्योती विठ्ठल बारब्दे वय ४४ वर्ष (आरोपी क्र. ०१ ची आई), आरोपी क्र. ०३. सौ. वंदना शिवदास बारब्दे वय ४२ वर्ष (आरोपी क्र. ०१ ची मावशी) सर्व राहणार जऊळका ता. आकोट जि. अकोला या आरोपींनी जऊळका येथील ३३ वर्षीय निलेश काशिनाथ दळणकार यांच्या डोक्यावर वार करून त्याचा खून केल्याचे सिध्द झाल्याने वरील तिन्ही आरोपींना त्यांच्या नैसर्गिक जीवनाच्या अंतापर्यत आजन्म कारावासाची आणि प्रत्येकी रु. २५,०००/ रक्कमेची आणि दंड न भरल्यास तीन वर्षाच्या अधिकच्या कारावासाची शिक्षा ठोठावली.

त्याचप्रमाणे या तिन्ही आरोपींना भादंविच्या कलम ४५२ सहकलम ३४ या कलमांर्तगत पाच वर्षाची सक्षम कारावासाची आणि प्रत्येकी १०,००० /- रू दंड व दंडाची रक्कम न भरल्यास एक वर्षाच्या अधिकच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. सोबतच भादंवि च्या ३२३ सह कलम ३४ या कलमांर्तगत या तिघा आरोपींना सहा महिन्याच्या सक्षम कारावासाची आणि प्रत्येकी एक हजार रूपये दंडाची व दंड न भरल्यास एक महिन्याचा अधिकच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. वरील प्रमाणे कारावासाची शिक्षा आरोपींनी एकत्रितरित्या भोगावयाच्या आहेत. द्रव्यदंड न भरल्यास वैकल्पिक कारावासाची शिक्षा आरोपींनी स्वतंत्र म्हणजे एका नंतर दुसरी नंतर तिसरी अशा भोगावयाच्या आहेत. तसेच आरोपींनी द्रव्यदंड भरल्यास त्यातील ७५,०००/- रू. आर्थिक नुकसान भरपाई म्हणून फिर्यादी देवकाबाई काशिनाथ दळणकार (मृतकची आई) हिला अपील कालावधी नंतर देण्यात यावेत. व द्रव्यदंडाची उर्वरित रक्कम अपील कालावधी नंतर सरकार जमा करण्यात यावी. असा न्यायनिर्णय विद्यमान आकोट न्यायालयाने पारित केला आहे. सरकार तर्फे या प्रकरणात अॅड. अजित देशमुख यांनी कामकाज पाहिले.

या प्रकरणाची थोडक्यात हकीगत अशी आहे की, फिर्यादी श्रीमती देवकाबाई काशिनाथ दळणकार वय ५८ वर्षे रा. जवूळका यांनी पो.स्टे. दहीहांडा येथे दि. ४/५/२०१९ रोजी जबानी तक्रार दिली की, माझा मुलगा निलेश हा विद्युत विभागात चोहट्टा येथे नोकरीला असल्याने तो चोहट्टा येथे येणे जाणे करतो. माझ्या मुलाची पत्नी ही देखील विद्युत विभागात नांदूरा येथे नोकरीला असल्याने ती तीथेच राहते. घटनेच्या एक दिवस अगोदर म्हणजे दि. ३/५/२०१९ रोजी जवूळका येथे आमचे शेजारी विठ्ठल बारब्दे व त्याची पत्नी नामे सौ. ज्योती विठ्ठल बारब्दे हे रात्री ८ वा. च्या सुमारास आमच्या घरी आले व निलेश याला म्हणाले की तु माझे पती सोबत वाद का केला? आम्ही उद्या तुला पाहून घेवु. असे म्हणून ते निघुन गेले. त्यानंतर आम्ही जेवण करुन झोपलो.

परंतु दुसरे दिवशी म्हणजे दि. ४/५/२०१९ रोजी पहाटे ५ वा.चे सुमारास मी फिर्यादी झोपेतून उठले. माझा मुलगा निलेश झोपलेलाच होता. मी माझे घराची झाडपुस करीत असतांना आरोपी मुकेश उर्फ सागर विठ्ठल बारब्दे त्याची आई सौ. ज्योती विठ्ठल बारब्दे व सागरची मावशी सौ. वंदना शिवदास बारब्दे हे तीघेजण एकदम आमच्या घरात आले. निलेश हा झोपलेला असतांना आरोपी नं. 1 मुकेश उर्फ सागर विठ्ठल बारब्दे याने त्याच्या हातातील कु-हाड निलेशच्या डोक्यावर मारली. तेव्हा मी जोरात आरडा ओरड केली असता, आरोपी नं. 2 सौ. ज्योती विठ्ठल बारब्दे हिने मला मिठीत पकडले.आरोपी नं. 3 सौ. वंदना शिवदास बारब्दे हिने मला चापटा व बुक्यांनी मारहाण केली. अशी झटापट होत असतानाच आरोपी सागर बारब्दे यास निलेशनला जिवाने मारुन टाक असे दोघेही म्हणाल्या. मी आरडा ओरड केल्याने शेजारी राहणारे वसंत दळणकार, शंकर दळणकार हरिभाऊ सदाफळे, गजानन सदाफळे व सुरेश दळणकार हे घटनास्थळी धावत आले. त्यामुळे आरोपी सागर बारब्दे हा हातात कु-हाड घेवुन निघुन गेला.

त्यानंतर आरोपी सौ. ज्योती विठ्ठल बारब्दे व आरोपी सौ. वंदना शिवदास बारब्दे हया सुद्धा शिवीगाळ करीत निघुन गेल्या. निलेश याच्या डोक्यातून रक्त निघत असल्याने गावातील अनुराग शेटे, वसंत दळणकार व शंकर दळणकार यांनी गावातील अनिल तायडे यांच्या गाडीमधून त्याला इलाजाकरीता अकोला येथे नेले. गंभीर जखमी निलेशची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला आयकॉन हॉस्पीटल अकोला येथे दाखल करण्यात आले. त्याचे डोक्यावरील जखमांचे सिटीस्कॅन करण्यात आला. व तिथे मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रीयेनंतर जखमी निलेशची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला व्हेंटीलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले. व त्यांतर दि.४/५/२०१९ रोजी दुपारी ३.३० वा. आयकॉन हॉस्पीटल येथे निलेशचे निधन झाले.

या प्रकरणात निलेशच्या आईच्या तक्रारीवरुन दहीहांडा पोलीसांनी अपराध क्र. १३१/२०१९ प्रमाणे भादवि कलम ३०२,४५०, ४५२ (३४) अन्वये खुनाचा गुन्हा नोंदवला. त्यानंतर तपास करुन वरील तिन्ही आरोपींविरुध्द वि.न्यायालय अकोट येथे दोषारोप पत्र दाखल केले. या प्रकरणात सरकार पक्षा तर्फे सरकारी वकील ॲड अजित देशमुख यांनी एकुण १० साक्षीदारांच्या साक्षी नोंदविल्या.त्यामध्ये प्रामुख्याने मृतक निलेशची आई जी या घटनेची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. दुसरे साक्षीदार जहीर शाह कदीर शाह जे वरुळ येथील पो. पाटील आहेत त्यांची साक्ष, ज्याच्या समक्ष आरोपी सागरने स्वतःच्या घरातुन गुन्हयात वापरलेली कु-हाड काढून दिली, तसेच निलेशच्या घरातून आरोपी कु-हाड घेवून बाहेर पडत असतांना ज्या साक्षीदारांनी साक्ष दिली त्या दोन साक्षीदारांची साक्ष, आयकॉन हॉस्पीटलचे डॉ. अनुप केला ज्यांनी मृतक निलेशच्या ब्रेनचे ऑपरेशन केले त्यांची साक्ष, मृतक निलेशचे पोस्टमार्टन केलेले डॉ. अंकीत अरविंद तायडे यांची साक्ष, डॉ. रुपेश कळसकार यांनी ज्या गुन्हातील शस्त्राबाबत

अभिप्राय देणारे तथा तपास अधिकारी पो. निरीक्षक शांतीलाल भिलावेकर यांची साक्ष यामुळे सरकार पक्षाला महत्त्वाची मदत झाली. शिक्षेसंबंधी सरकारी वकील अजीत देशमुख यांनी युक्तीवाद केला की, या आरोपींनी कटकारस्थान करुन संगनामताने खुन करण्याच्या उद्देशानेच निलेशच्या डोक्यावर कु-हाडीचे घाव घालून अतिशय निर्दयपणे त्याचा खुन केला आहे. त्यामुळे या तिन्ही आरोपींना नैसर्गीक मृत्यु येईपर्यंत आजिवन सश्रम कारावासाची (जन्मठेपेची) शिक्षा दयावी. मृतक निलेशचा ४ वर्षीय अजाण मुलगा अर्णव याचे देखील पितृछत्र या आरोपींमुळेच गेले. त्यामुळे या अज्ञान मुलाला वि. न्यायालयाने आरोपींकडून जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याचा आदेश दयावा अशी विनंती सरकारी वकील अजित देशमुख यांनी वि. न्यायालयाला केली. या प्रकरणात सरकार पक्षाला ॲड. अतुल देशमुख व ॲड. कुटे यांनी व दहीहांडा पो.स्टे. चे पैरवी बुंदेले यांनी सहकार्य केले. सर्व आरोपी तर्फे ॲड. मोतीसिंह मोहता, व ॲड. दिपक काटे यांनी कामकाज पाहिले. तर सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी कामकाज पाहिले. दोन्ही पक्षांच्या युक्तीवादानंतर वि. न्यायालयाने तीन्ही आरोपिंना वरील प्रमाणे शिक्षा ठोठावली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments